तरूणाईला गृहीत धरणे राजकीय पक्षांना तोट्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:07 PM2019-04-09T23:07:41+5:302019-04-09T23:07:47+5:30

- मनोज मुळ्ये आजचा तरूण इंटरनेटच्या आहारी गेला आहे, सोशल मीडियामध्ये अडकून पडलेला आहे, त्याला सामाजिक भान नाही, अशा ...

Political parties lose sight of assuming Tarunai | तरूणाईला गृहीत धरणे राजकीय पक्षांना तोट्याचे

तरूणाईला गृहीत धरणे राजकीय पक्षांना तोट्याचे

Next

- मनोज मुळ्ये
आजचा तरूण इंटरनेटच्या आहारी गेला आहे, सोशल मीडियामध्ये अडकून पडलेला आहे, त्याला सामाजिक भान नाही, अशा पद्धतीने अनेक आरोप आताच्या तरूणांवर होतात. तसं पाहिलं तर प्रत्येक पिढीला याच पद्धतीच्या आरोपांना तोंड द्यावे लागतेच. पण कधी या तरूणाईच्या जवळ जाऊन पाहिलं तर लक्षात येतं की, इंटरनेटच्या वापरामुळे या तरूण पिढीकडे ज्ञानाचे खूप मोठे भांडार आहे. या पिढीला स्वत:ची अशी ठाम मते आहेत. सोशल मीडियामुळे या तरूणाईची जगाशी ओळख आहे. गरज आहे ती त्यांना दिशा मिळण्याची. वाढत्या स्पर्धेमुळे ही पिढी अस्वस्थ आहे. खूप दबावाखाली आहे. गरज आहे ती आश्वस्त करण्याची. या निवडणुकीत तरूणांचा टक्का चांगल्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या तरूणांना कायमस्वरूपी आपलेसे करण्यासाठी राजकीय पक्षांना त्यांचा स्वतंत्र विचार करायला लागेल. या तरूणाईला गृहीत धरणे राजकीय पक्षांना महाग पडू शकते. तोट्याचे ठरू शकते.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या अथक परिश्रमांमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात नवमतदारांची संख्या जवळपास १ लाखांनी वाढली आहे. हे नवमतदार १८ ते १९ या वयोगटातील आहेत. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नवमतदार नोंदणीवर खूप मोठा भर दिला होता. रत्नागिरी जिल्ह्यात त्यासाठी खूप उपक्रम राबवण्यात आले. प्रत्येक महाविद्यालयात जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले आणि मतदार नोंदणीसाठी अर्ज भरण्याचे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही थोड्याफार याच पद्धतीने नवमतदारांसाठी मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात १ लाखाने नोंदणी वाढली.
१८ ते १९ या वयोगटातील हे १ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यांना अजूनही राजकीय पक्ष, ध्येयधोरणे यांची ओळख झालेली नाही. ते अजूनही शिक्षण घेत आहेत. या मुलांसमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो त्यांना आवश्यक असलेल्या उच्च शिक्षणाचा आणि हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आवश्यक असलेल्या नोकरीचा. रत्नागिरी जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या खूपच मर्यादीत सुविधा आहेत. ज्या सुविधा आहेत, त्या खासगी असल्याने तेथील शुल्क परवडणारे नाही. त्यामुळे या नवतरूणांना आपल्या उच्च शिक्षणाची चिंता आहे. त्या सुविधा देण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.
यावेळी एकूण १४ लाख ४0 हजार मतदारांपैकी साधारपणे ४ लाख मतदार १८ ते २५ वयोगटातील आहेत. या तरूण मतदाराला कोणता पक्ष आकृष्ट करणार, यावर निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे. शिक्षण पूर्ण झालेल्या तरूणांसमोर प्रश्न आहे तो नोकरीचा. व्यवसाय करण्यासाठी पुरेसे भांडवल नाही, असा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. अशा तरूणांना फक्त नोकरी हाच आधार आहे. पण दुर्दैवाने जिल्ह्यात नवे प्रकल्प येत नाहीत. त्यामुळे नोकरीसाठी एकतर बाहेरगावचा रस्ता धरणे नाहीतर जिल्ह्यातच मिळेल ती नोकरी, मिळेल त्या पगारावर करणे, एवढाच पर्याय या तरूणांसमोर आहे. तसं पाहिलं तर सर्वच राजकीय पक्षांनी रोजगाराच्या मुद्द्याला जाहीरनाम्यात महत्त्वाचे स्थान दिले आहे. पण अशी आश्वासने अनेकदा मिळतात. त्यातून पुढे काहीच होत नाही. आम्ही तुमच्यासाठी आहोत, या पद्धतीने या तरूणाईला आश्वस्त करणे आवश्यक आहे. हे धोरण घेऊन जास्तीत जास्त तरूणांपर्यंत पोहोचणे ज्या पक्षाला जमेल त्याच्या पदरात या तरूणाच्या मतांचे माप नक्की पडेल.
नवीन पिढी मतदानाबाबत अधिक उत्साही असल्याचे विविध सर्वेक्षणांमधून पुढे आले आहे. ‘लोकमत’ने केलेल्या तरूणाईच्या सर्वेक्षणातही ही पिढी मतदानासाठी उत्सुक असल्याचे प्रकर्षाने पुढे आले आहे. आम्हाला मतदान करायचंय, अशीच भावना असंख्य मुलांच्या मनात होती. त्यात जबाबदारीपेक्षा उत्साहाचे प्रमाण अधिक आहे, हे मान्य. पण पहिल्याच मतदानाला त्यांच्याकडून जबाबदारीची अपेक्षा करणेही चुकीचे ठरेल.
या पिढीला शिक्षण आणि रोजगारात अधिक स्वारस्य आहे. ही पिढी बेधडक आहे. इंटरनेटशी जवळीक असल्याने ही पिढी पारंपरिक निकषांवर अवलंबून न राहता स्वत: माहिती घेणारी पिढी आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना या नवमतदारांना गृहीत धरू भागणार नाही. या पिढीला काय हवंय हे ओळखून त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागेल. त्यांच्या भाषेत त्यांच्याशी संपर्क साधावा लागेल. त्यांच्या मनातला अस्वस्थपणा कमी करावा लागेल. या पिढीला नुसती आश्वासने देऊन चालणार नाही. ही पिढी थेट बोलणारी पिढी आहे. त्यामुळे वेळ पडली तर राजकीय पक्षांना सुनावण्याची जबाबदारीही ते पेलतील. काही क्षणात असंख्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्यांना माहिती आहे. त्यामुळे एखाद्या अन्यायाविरोधात ही तरूणाई पटकन एकत्र होऊ शकते, याचे भानही राजकीय पक्षांना बाळगावे लागेल.
शिक्षण आणि रोजगार या तरूणाईच्या दोन प्रमुख गरजा आहेत. त्यांना जातीपातीच्या राजकारणात रस नाही. किंबहुना ग्लोबली विचार करणाऱ्या या तरूणाईसमोर जातीपातीच्या आधारावर मांडलेली गणिते खूप त्रासदायक ठरतील. ही खरं तर राजकीय पक्षांना खूप मोठी संधी आहे. प्रामाणिक काम करणाऱ्यांना ते अधिक सोपे होईल. या तरूणाईसमोर आताच चांगला आदर्श उभा करणाºया पक्षाला पुढची अनेक वर्षे मतदार शोधावे लागणार नाहीत.

Web Title: Political parties lose sight of assuming Tarunai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.