gram panchayat election: निवडणुकीआधीच पक्षांनी काढलंय अंग, सर्वत्र गाव पॅनलचा चंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 06:37 PM2022-12-05T18:37:19+5:302022-12-05T18:38:47+5:30

निवडणुकीनंतर अमुक ग्रामपंचायत व सरपंच आमच्या पक्षाचे म्हणून दावा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

political parties took the role of village level decision making In Gram Panchayat elections | gram panchayat election: निवडणुकीआधीच पक्षांनी काढलंय अंग, सर्वत्र गाव पॅनलचा चंग

gram panchayat election: निवडणुकीआधीच पक्षांनी काढलंय अंग, सर्वत्र गाव पॅनलचा चंग

googlenewsNext

संदीप बांद्रे

चिपळूण : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावपातळीवर वातावरण पूर्णत: ढवळून निघायला सुरुवात झाली आहे. मात्र, या निवडणुकीचा धुरळा उडण्याआधीच राजकीय पक्षांनी अंग काढण्यास सुरुवात केली आहे. आता तुम्ही तुमचे गावपातळीवर बघा, अशी भूमिका पक्ष व राजकीय नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनीही बिनविरोधचा चंग बांधण्यास सुरुवात केली आहे.

सध्या जिल्ह्यात २२२ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीमुळे भर हिवाळ्यात गावांमध्ये वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गटा-तटाचे राजकारण सर्वात जास्त पाहायला मिळते. त्यात एखाद्या गावात राजकीय हस्तक्षेप असेल तर फोडाफोडीलाही वेगळेच महत्त्व प्राप्त होते.

परंतु, या वेळच्या निवडणुकीत एकाही राजकीय पक्षाने थेट निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतलेला नाही. उलट तुमचे तुम्ही गावपातळीवर बघा, असा सल्ला देत असल्याने सर्व जबाबदारी ग्रामस्थांवर येऊन पडली आहे. अगदी राष्ट्रवादी, शिवसेना व शिंदे गटानेही हीच भूमिका घेतल्याने गावपुढाऱ्यांमध्येच निवडणुकीचा ज्वर टोकावर पोहोचू लागला आहे. मात्र, त्यातही काहींनी बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही ठिकाणी बिनविरोधाचा प्रस्ताव मोडकळीस आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी दोनपेक्षा अधिक गट-तट एकत्र येऊन वेगवेगळ्या जोडण्या लावण्याचे काम करीत आहेत.

गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत महत्त्वाचे ठरत असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक महत्त्वाची ठरत आहे. याव्यतिरिक्त केंद्र शासन राज्य शासन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनी ग्रामपंचायतीकडे सोपवलेली योजनांची अंमलबजावणी करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असल्याने त्याला राजकीय महत्त्वही तितकेच आले आहे.

कार्यकारी शक्ती प्रदान

मुळात पंचायतराजमधील सर्वात खालचा, पण महत्त्वाचा टप्पा म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. अधिनियमानुसार सरपंच यांना कायद्यानेच कार्यकारी शक्ती प्रदान केली आहे. त्याशिवाय शासन निधीची क्षमताही वाढली आहे. त्यामुळे पंचायत समितीपेक्षा ग्रामपंचायतच बरी असे आता म्हटले जाते. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य होण्यासाठी गावात स्पर्धा सुरू झाली आहे.

निवडणुकीनंतर ‘सरपंच’ आमचा

ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपा आणि शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा विचार केला जाईल, असे सुरुवातीला वाटले होते. मात्र, एकाही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी अजून तरी ‘एण्ट्री’ घेतलेली दिसत नाही. परंतु, निवडणुकीनंतर अमुक ग्रामपंचायत व सरपंच आमच्या पक्षाचे म्हणून दावा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे

Web Title: political parties took the role of village level decision making In Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.