राजकीय गुंतागुंत उलगडणारी रंगमंचावरची ‘प्यादी’

By admin | Published: November 19, 2014 09:22 PM2014-11-19T21:22:16+5:302014-11-20T00:02:42+5:30

राज्य नाट्य स्पर्धा : संकल्प कला मंचच्या कलाकारांचे प्रभावी सादरीकरण...

The political thrashing thriller 'The pawn' | राजकीय गुंतागुंत उलगडणारी रंगमंचावरची ‘प्यादी’

राजकीय गुंतागुंत उलगडणारी रंगमंचावरची ‘प्यादी’

Next

मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरी राजकीय गुंतागुंत उलगडताना बुध्दिबळाच्या पटाप्रमाणे ‘प्यादी’चे सादरीकरण प्रेक्षकांना भावले. वास्तविक राजकारणी मंडळी स्वाभिमान, आदर्शवाद, मानवतावाद या संकल्पना खोट्या अविर्भावात राबवितात. सत्तेच्या उन्मादात त्यांना कशाचे भान राहात नाही. याचे यथार्थ चित्रण लेखक मनोहर सुर्वे यांनी ‘प्यादी’तून केले आहे. वास्तविक नाटकाच्या सुरूवातीला आकलन होण्यास अवघड वाटणाऱ्या नाटकाने दिग्दर्शकांच्या (विनोद वायंगणकर) कल्पकतेमुळे व कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणामुळे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले. नेपथ्य, प्रकाश, रंगभूषा, वेशभूषा सर्व बाबतीत संस्था यशस्वी ठरली. शिवाय रंगमंचाचा पूरेपूर वापर करून साधे सोपे नेपथ्य उभारण्यात आले होते. बुध्दिबळाचा पट व सोंगट्यांवरील कलाकारांचा वावर यामुळे नाटकाचे शिर्षक सार्थ ठरते. सर्वसामान्य व्यक्तिला राजकारण कळत नाही. शिवाय राजकारणात टाकण्यात येणाऱ्या फाशामुळे त्याची त्रेधात्रिरपीट उडते. सत्ता मिळवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर केला जातो. सत्ता मिळाल्यानंतर आलेल्या उन्मादात गोरगरीब जनतेला दिलेल्या अभिवचनाचा विसर पडतो. स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या राजकारणी मंडळींचे चित्रण या नाटकाव्दारे करण्यात आले आहे. धनगरपूत्र आदित्यनाथ (ओंकार पाटील) याला कौटिल्य (संतोष गार्डी) चंचलराष्ट्राचा राष्ट्राधिपती बनवितो. मात्र, सत्तेच्या उन्मादात भान विसरलेल्या आदित्यनाथाची गादी ऐश्वर्य व भोगाची लालसा असलेल्या शिखंडी (जयेंद्र शिवलकर) याच्याशी हातमिळवणी करीत शक्तीदेवी (पूजा जोशी) सत्ता काबाीज करते. परंतु सत्तेची खुर्ची मिळाल्यानंतर सत्तेचा अहंकार प्रत्येकालाच येतो. शक्तीदेवीसुध्दा याला अपवाद राहात नाही. सत्ता मिळाल्यानंतर मैत्रीचा गैरवापर करते. विजय (निशांत जाधव), प्रतिमा/मेनका (प्रज्ञा चवंडे) यांचा वापर स्वार्थासाठी केला जातो. नाटक भूतकाळातून वर्तमानकाळात व भविष्याचा वेध घेणारे ठरले. या नाटकांतून स्वार्थासाठी सर्वसामान्यांच्या पुरूषत्व किंवा स्त्रीत्वाचीही बाजी लावली गेली. पराभवानंतर राजकारण्यांची होणारी चीडचीड, वेळ व प्रसंगानुसार बदलणाऱ्या धूर्त राजकारण्यांची भूमिका शक्तीदेवीच्या माध्यमातून प्रज्ञा जोशी यांनी रंगमंचावर सादर केली. सर्वसामान्यांचे प्रतिनिधी असलेल्या विजय व प्रतिमा यांच्या प्रेमकहानीला राजकारण्यांमुळे मिळणारा ब्रेकअप, अन्यायाने क्रूर झालेला विजय कसा सूड घेतो. सर्वसामान्यालाही सत्तेची अभिलाषा निर्माण होते, परंतु राजकारणासाठी कल्पक बुध्दीची आवश्यकता असते. कौटिल्याच्या सल्ल्यानुसार सत्ता मिळेल, ही महत्त्वाकांक्षा मांडण्यात आली. त्यामुळे आदित्यनाथाच्या मृत्यूनंतर सर्वसामान्य माणसापेक्षा शक्तीदेवीची निवड करण्यात आली. राजकारण कायमचे संपवण्यासाठी डाव आखणाऱ्या राजकारणातील सूत्रधारालाच (कौटिल्य) संपवण्याचे व सर्वसामान्य माणसांचा होणारा अडसर विचारात घेऊन त्यांनाही मार्गातून कायमचे बाजूला करण्याचे दोन निर्णय शक्तीदेवी घेते. सत्तेवर येण्यापूर्वी याचना करणारी शक्तीदेवी सत्ता मिळाल्यानंतर कशी क्रूर होते. नजरेच्या इशाऱ्यावर डाव आखणाऱ्या शक्तीदेवीची भूमिका अभिनयातून मांडणाऱ्या पूजा जोशी यांची अदाकारी सर्वांनाच भावली. ‘प्यादी’व्दारे राजकारणाचे नियम मांडण्याचा प्रत्यत्न दिग्दर्शकाने केला. कलाकारांनीसुध्दा स्वत:च्या अभिनयासाठी घेतलेली पुरेपूर मेहनत नाटकातून दिसून आली. त्यामुळे सावरकर नाट्यगृह सुरूवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांनी भरलेले होते. नाटकाच्या सुरूवातीला सूत्रधाराने पात्रांची ओळख करून दिली. पहिल्या अंकापर्यंत नाटकाच्या संहितेचा काहीच बोध होत नसल्याची प्रतिक्रिया पे्रक्षागृहातून ऐकू येत होती. मात्र, दुसऱ्या अंकातून हळूहळू नाटक व त्याचे कथानक उलगडत गेले. वास्तविक अतिशय क्लिष्ट विषय असलेले ‘राजकारण’ काही तासात प्रेक्षकांसमोर सादर करण्याची दिग्दर्शकांची कल्पना सुंदर वाटली. संकल्प कला मंचच्या वैशिष्ट्यामुळेच नाटकातील कुतूहल शेवटपर्यंत टिकून राहिले. कौटिल्याची भूमिका दुसऱ्या अंकात स्पष्ट कळली. निर्मिती देवता (कृष्णकांत साळवी) या पात्राचा रंगमंचावरील वावर कमी होता, संवाद तर नव्हताच, परंतु दिग्दर्शकांच्या कल्पकतेमुळे नाटकाला पौराणिक स्वरूपही प्राप्त झाले होते. बुद्धिबळाच्या खेळामध्ये विरोधकावर मात करण्यासाठी स्पर्धक कल्पकता वापरतो. त्याचप्रमाणे राजकारणात सत्ताधारी व विरोधक एकमेकांच्या विरोधात कशा कुरघोड्या करतात. सत्ता मिळवण्याच्या लालसेपोटी हैवान झालेल्या राजकारण्यांचे चित्रण रंगवण्यात आले आहे. सत्ता निसटल्यानंतर हतबल झालेले व सत्ता मिळाल्यानंतर उन्मादाच्या नशेत व्यस्त असलेल्या राजकारणी मंडळींचे चित्रण करण्यात आले. विविध प्रसंग मांडताना देण्यात आलेले पार्श्वसंगीत उत्कृष्ट होते. रवींद्र साळुंखे यांनी पार्श्वसंगीताची बाजू ठोसपणे सांभाळलेली दिसून आली. बुध्दिबळाच्या पटाप्रमाणे नेपथ्य उभारण्यात नंदकुमार भारती यशस्वी ठरले. प्रकाशयोजना विनयराज उपरकर, रंगभूषा (आेंकार पेडणेकर), वेशभूषा (तुषार बनगे, ज्ञानेश्वर पाटील) तर रंगमंच व्यवस्था रवींद्र मुळ्ये, चंद्रकांत कांबळे, विजय वाडेकर, विलास कुर्टे, सत्यविजय शिवलकर, प्रशांत फगरे, श्रीकांत फगरे, अजित पाटील, अपर्णा आडविरकर, शलाका सावंतदेसाई यांनी सांभाळली होती. सायंकाळी सुरू झालेला पाऊस, ढगांचा गडगडाट व विजेचा कडकडाट सुरू असतानासुध्दा प्रेक्षक सुरूवातीपासून शेवटपर्यंत टिकून होते. प्रेक्षकांचे कुतुहूल वाढवत, जिज्ञासा ताणत ठेवणाऱ्या नाटकाचा शेवटही अनपेक्षित परंतु योग्य वाटला. सत्तेसाठी याचना करणारी मंडळी सत्ता मिळताच कशी उद्दाम होतात, हे नाटकातून दाखवून देण्यात आले. राज्य नाट्य स्पर्धेत संकल्प कला मंचने सादर केलेल्या नाटकाच्या प्रभावामुळे अन्य स्पर्धकांपुढे मात्र आव्हान उभे ठाकले आहे.

Web Title: The political thrashing thriller 'The pawn'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.