राजकारण, टीकाटिप्पणीची ही वेळ नाही : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:33 AM2021-05-09T04:33:18+5:302021-05-09T04:33:18+5:30
रत्नागिरी : लसीकरण व फोटो काढल्याप्रकरणी सध्या सोशल मीडियावरून माझ्यावर टीकाटिप्पणी सुरू आहे. मात्र, ही टीकाटिप्पणी करताना आधी विषय ...
रत्नागिरी : लसीकरण व फोटो काढल्याप्रकरणी सध्या सोशल मीडियावरून माझ्यावर टीकाटिप्पणी सुरू आहे. मात्र, ही टीकाटिप्पणी करताना आधी विषय समजून घेतला असता तर बरे झाले असते. डाॅ. विनय नातू, बाळ माने यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे. मात्र, त्यांच्याकडून असे कृत्य व्हावे, याचेच आश्चर्य वाटते़ आता राजकारण आणि टीकाटिप्पणीची ही वेळ नाही़ जिल्ह्यातून कोरोना हद्दपार करण्यासाठी वेळ पडेल तेव्हा या मंडळींचेही मी मार्गदर्शन घेईन. शिवाय आवश्यकता भासली तर चर्चाही करतो, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.
वास्तविक जिल्हा प्रशासनाला नवीन कॅमेरे देण्यात आले आहेत़ या कॅमेऱ्यांचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात यावे, असे सुचविल्यानंतर मी फोटो काढला. फाेटाे काढताना खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यापासून सुरक्षित अंतरच ठेवलेले हाेते, असे सांगितले़ यावेळी त्यांनी बाळ माने यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला़ ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी माझी नाही, हे वक्तव्य मी केलेले नाही. मात्र, लस पुरवठा करण्याची जबाबदारी केंद्राची असून त्यांच्याकडून लस प्राप्त झाल्यानंतर नागरिकांसाठी लसीकरणासाठी नियोजन करण्यात येणार आहे. वास्तविक माझ्यावर केलेल्या आरोपाचा मी निषेध करतो, असे सामंत म्हणाले़
राजकारण करायचं असेल तर ते निवडणुकीत करावे. टीका करणाऱ्यांनी मला फोन करून विचारावं, बेजबाबदार वक्तव्य करू नयेत. यापुढे त्यांच्या कुठल्याही वक्तव्याची दखल घेतली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले़ माझ्या जिल्ह्यात नाही तर राज्यातील कुठल्याही जनतेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मदत लागेल त्यासाठी मी बांधील असल्याचे त्यांनी सांगितले.
नारायण राणे यांच्या भूमिकेचे काैतुक
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या रात्री १२ वाजल्यापासून दि.१५ मेपर्यंत कडक लाॅकडाऊन करण्यात येणार आहे. लाॅकडाऊन करावं लागणार असल्याबाबत मी खासदार नारायण राणे यांच्याशी फोनवरून चर्चा केली़ त्यावेळी त्यांनी त्यांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून पालकमंत्री म्हणून माझ्या निर्णयास पाठिंबा दर्शविला. पालकमंत्री म्हणून तुम्ही घेतलेल्या निर्णयासाेबत आम्ही तुमच्यासाेबत असल्याचे ते म्हणाल्याचे उदय सामंत म्हणाले़ ही राजकीय प्रगल्भता म्हणावी लागेल. त्यामुळे मी त्यांचा नेहमीच आदर करीत असल्याचे सामंत म्हणाले़