पोमेंडी बु. ग्रामपंचायतीत आचारसंहितेचा भंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 03:39 PM2019-03-29T15:39:29+5:302019-03-29T15:40:24+5:30
आचारसंहितेच्या काळात ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना टी - पॉयचे वाटप केल्याप्रकरणी रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तालुक्यातील पोमेंडी बु. ग्रामपंचायतीवर कारवाई केली आहे. या कारवाईत ५६ टी-पॉय जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
रत्नागिरी : आचारसंहितेच्या काळात ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना टी - पॉयचे वाटप केल्याप्रकरणी रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तालुक्यातील पोमेंडी बु. ग्रामपंचायतीवर कारवाई केली आहे. या कारवाईत ५६ टी-पॉय जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीसाठी आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. या काळात कोणत्याच राजकीय पक्षांना शासकीय योजना राबवता येत नाहीत, वस्तूंचे वाटपही करता येत नाही किंवा निर्णय घेता येत नाहीत. जिल्ह्यात आचारसंहिता जारी असतानाच तालुक्यातील पोमेंडी बु. ग्रामपंचायतीमार्फत तेथीलच आरोग्य केंद्रात ग्रामस्थांना टी - पॉयचे वाटप करण्यात येत होते. हे वाटप सुरू असल्याची माहिती तहसीलदार शशिकांत जाधव यांना मिळताच त्यांच्या भरारी पथकाने छापा मारला.
ग्रामपंचायतीच्या निधीतून हे टी - पॉय देण्यात येत असल्याची माहिती या कारवाईदरम्यान समोर आली. ग्रामस्थांना देण्यासाठी एकूण २०० टी - पॉय आणले होते. त्यातील काही टी - पॉयचे वाटप करण्यात आले, तर पथकाच्या हाती ५६ टी - पॉय लागले आहेत. हे सर्व टी - पॉय जप्त करण्यात आले आहेत.