रत्नागिरी जिल्हा कृषी, औद्योगिक संघ संचालकपदी पूजा निकम, ऋतुजा कुळकर्णी
By मनोज मुळ्ये | Published: November 7, 2023 05:23 PM2023-11-07T17:23:47+5:302023-11-07T17:23:56+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघाच्या संचालकपदी राष्ट्रवादीच्या पूजा शेखर निकम आणि भाजपच्या ऋतुजा उमेश कुळकर्णी ...
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघाच्या संचालकपदी राष्ट्रवादीच्या पूजा शेखर निकम आणि भाजपच्या ऋतुजा उमेश कुळकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक, सहकारतज्ज्ञ ॲड. दीपक पटवर्धन, तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी कृषी, औद्योगिक संघाच्या संचालकपदी कोणी अर्ज भरायचे हे ठरवले होते. त्यामुळे एक जागा राष्ट्रवादीला व दुसरी जागा भाजपला मिळाली आहे.
बिनविरोध निवडून आलेल्या संचालिका ऋतुजा कुळकर्णी रत्नागिरी तालुक्यातील धामणसे ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत. यापूर्वी त्यांनी सदस्यपदाची निवडणूक दोन वेळा लढवली आणि त्या विजयी झाल्या आहेत. त्या धामणसे विविध कार्यकारी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालिका आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या असून, नजीकच्या काळात जिल्हा खरेदी विक्री संघावर संचालक म्हणून निवडून आलेल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. कृषी, औद्योगिक संघाच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर ऋतुजा कुळकर्णी यांनी सर्वांचे आभार मानून भविष्यात शेतीसंदर्भाने, शेतकरी, उद्योजकांना उपयुक्त असे कामकाज करू, असे मत व्यक्त केले.
पूजा निकम या चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती असून, त्या राजकारणासह सहकार व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या बिनविरोध निवडीबद्दल भाजपचे नेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी ऋतुजा कुळकर्णी यांचे अभिनंदन केले आहे.