मोरोशीत महिलांशी अश्लील वर्तन
By admin | Published: May 24, 2016 09:50 PM2016-05-24T21:50:18+5:302016-05-25T00:31:04+5:30
गावपुढाऱ्याचा प्रताप : पाणी पेटणार, पोलीस ठाण्यात तक्रार
राजापूर : मोरोशी ग्रामपंचायत कार्यालयात काही गावपुढाऱ्यांनी महिला सदस्यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करत त्यांच्या वस्त्रांना हात घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मोरोशी ग्रामपंचायतीमधील काही महिला सदस्यांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पाणी प्रश्नावरून सुरू असलेल्या चर्चेवेळी हा प्रकार घडल्याची माहिती मोरोशीचे सरपंच सरपंच भालचंद्र ऊर्फ रमेश कानडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मोरोशीची ग्रामसभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र, आवश्यक गणपूर्तीअभावी सभा तहकूब करण्यात आली. त्यावेळी गावातील काही मंडळी सरळ सभागृहात आली व आपल्याला पाणी प्रश्नावरुन चर्चा करावयाची आहे. असे सांगत सरपंच कानडे यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. मोरोशी गावात गेल्या आठ दिवसांपासून मधलीवाडी, कदमवाडी, सोनारवाडी व मिरासवाडी या चार वाड्यांना नळपाणी योजनेतून पाणी पुरवठा सुरु करण्यात आला असून, आणखी चार वाड्यांना पाणी पुरवठा सुरु करावयाचा आहे. मोरोशी गाव हा टँकरग्रस्त गाव असून, पाण्याबाबत उपाययोजना सुरू असतानाच सभेत आलेल्या त्या गाव पुढाऱ्यांनी फक्त मधलीवाडीलाच पाणी पुरवठा करा. उर्वरित वाड्यांना पाणी देऊ नका, असा पवित्रा घेतला.
असे होणार नाही, टचाई असणाऱ्या सर्व वाड्यांना मी पाणी पुरवठा करणार आहे, असे सरपंच कानडे यांनी सांगून वाद घालणाऱ्या ग्रामस्थांचे म्हणणे फेटाळून लावले. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयातच वादंगाला सुरुवात झाली.
एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक झाली. उपस्थित महिला सदस्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न करताच त्या महिलांकडे आपला मोर्चा वळवत त्या गावपुढाऱ्यांनी महिलांना शिविगाळ करायला सुरुवात केली. एवढ्यावर भागले नाही तर महिलांच्या वस्त्रांना हात घालताना त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असा प्रकारही घडला. या प्रकाराची दखल घेऊन सरपंच कानडे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात संपर्क साधला. त्यानंतर सर्वजण पोलिसात हजर झाले. गावपुढारी पोलीस ठाण्यात आल्यावर महिला सदस्यांनी आपल्याला कशा पद्धतीने अपमानित करण्यात आले, याची माहिती दिली. (प्रतिनिधी)