समुद्रात बेकायदेशीर शेडच्या बांधकामाला बंदर विभागाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:44+5:302021-06-26T04:22:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शहरानजिकच्या राजीवडा येथे समुद्रात बेकायदेशीर शेडचे बांधकाम करणाऱ्या व्यक्तीला बंदर विभागाने नोटीस देऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शहरानजिकच्या राजीवडा येथे समुद्रात बेकायदेशीर शेडचे बांधकाम करणाऱ्या व्यक्तीला बंदर विभागाने नोटीस देऊन बांधकाम हटविण्याची सूचना केली आहे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर ही नाेटीस बजावण्यात आली आहे.
बांधकाम करणाऱ्या व्यक्तीला मोबाईलवरून सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त भादुले यांनी संपर्क साधून येत्या सोमवारपर्यंत बांधकाम पाडून टाकण्याची स्पष्ट सूचना दिली. तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कोस्टल झोन मॉनिटरिंग समितीच्या बैठकीतही हा विषय मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मच्छीमार नौकांमधील मासळी उतरवण्यासाठी राजीवडा समुद्रात शासनाने जेटी बांधली आहे. या जेटीला लागूनच समुद्रात अनधिकृतपणे शेड बांधली जात असल्याची तक्रार राजीवड्यातील स्थानिक मच्छीमार, नौकामालक आणि मासळी व्यापाऱ्यांनी केली. या तक्रारीत राजीवड्यातील मासळी व्यापाऱ्याने समुद्रात बांधकाम करत असल्याचे म्हटले आहे. जिल्हाधिकारी, सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त, बंदर विभाग, पतन विभाग, रत्नागिरी नगर परिषद आणि शहर पोलीस स्थानकात याबाबत तक्रारी देण्यात आल्या आहेत.
समुद्र क्षेत्र बंदर विभागाच्या अखत्यारित येत असल्याचे या विभागाने नोटीस देऊन समुद्रातील बांधकाम तोडण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर समुद्रातील जेटी मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्थानिक मच्छीमार युसुफ मुल्ला, माजी नगरसेवक बिजली खान, फकीर वस्ता, ताहीर मुल्ला, शाबीर पावसकर, हनिफ फणसोपकर उपस्थित होते. मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी जेटीची पाहणी केली, तेव्हा त्यांना जेटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी होडी आणून ठेवलेली दिसली. याबाबत त्यांनी मच्छिमारांकडे माहिती घेतली तेव्हा समुद्रातील बांधकामासाठी साहित्य नेता येऊ नये, यासाठी स्थानिक मच्छिमारांनी वाट अडवून ठेवल्याचे सांगितले. दरम्यान, तक्रार करून दहा दिवस झाले. बंदर विभागाची नोटीस आणि मत्स्य व्यवसाय विभागाकडून इशारा मिळेपर्यंत किती वाढीव बांधकाम झाले, हेही सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांना दाखविण्यात आले. त्यानंतर त्यांनी हे बांधकाम ताेडण्याची नाेटीस बजावली आहे.
-----------------------
राजीवडा येथे समुद्रात बेकायदेशीर शेडच्या बांधकामाची सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी पाहणी केली.