कंपनीचा विरोध मावळण्याची शक्यता
By admin | Published: March 20, 2016 10:01 PM2016-03-20T22:01:06+5:302016-03-20T23:52:20+5:30
आशापुरा मायनिंग : दर महिन्याला होणार आरोग्य शिबिर
दापोली : आशापुरा मायनिंग विरोधात केळशी पंचक्रोशीतून जनआंदोलन पेटले असतानाच कंपनीने केळशी पंचक्रोशीतील गरजू रुग्णांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन आज (रविवार) केळशी येथे केले होते. महावीर भवन येथे घेण्यात आलेल्या शिबिराच्या सुमारे अडीच हजार ग्रामस्थांनी लाभ घेतला. कंपनीच्या या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, यापुढे दर महिन्याला आरोग्य शिबिर घेण्यात येणार असल्याचे कंपनी व्यवस्थापक दीपक शेंडे यांनी सांगितले.
यावेळी केळशी पंचक्रोशीतील प्रतिष्ठीत नागरिक गोविंद केळशीकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत, डॉ. मुळ्ये, डॉ. मोकल तसेच कंपनीचे सहाय्यक महाव्यवस्थापक दीपक शेंंडे, पर्यावरण तज्ज्ञ मनोज शर्मा, निरज गावंडे, संजय सिंग, अविनाश नाईक, वैभव गायकवाड, पवनकुमार, अरविंद मनियार, धर्मंेद्रकुमार, सुकांन्ता दासगुप्ता, अरविंद हरीणखेरे, आशिष गाडगीळ, केळशी सरपंच सुरेंद्र कर्देकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिबिरार्थींना कंपनीतर्फे मोफत औषध, चहा, नाष्टा देण्यात आला. केळशी पंचक्रोशीतील अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणीसह मोफत औषध यावेळी रुग्णांना देण्यात आले.
या शिबिराचा केळशी, रोवले, उंबरशेत, आंबवली, चिंचाळी, मांदीवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घेतला. अनेक गरीब व गरजू कुटुंब या शिबिरात सहभागी झाली होती. अनेक वृद्ध रुग्णांना दापोलीत येणे शक्य होत नाही. अशा वृद्धांना आशापुरा कंपनीच्या या आरोग्य शिबिरामुळे केळशीतच तपासणीसह मोफत औषध उपचारांचा लाभ घेता आला. (प्रतिनिधी)
समाधान : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर
या आरोग्य शिबिरामुळे आम्हाला खूप फायदा झाला. कारण आम्हा ज्येष्ठ नागरिकांना दापोली किंवा इतर ठिकाणी जाणे शक्य नाही. केळशी गावात कंपनीने रुग्णांसाठी घेतलेले आरोग्य शिबिर आम्हाला खूप उपयोगी पडले. या शिबिराचा अनेक ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. परंतु, कंपनीने ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य शिबिराची सोय करुन दिल्याचे समाधान आहे.
- गोविंद केळशीकर, ज्येष्ठ नागरिक
मला अनेक आजार आहेत. प्रत्येकवेळी दापोलीत जावून तपासणी करुन औषध घेणे शक्य होत नाही. परंतु, कंपनीने घरापर्यंत गाडी पाठवून ज्येष्ठ नागरिक म्हणून तपासणी करुन औषध दिले. त्यामुळे या शिबिराचा चांगला लाभ झाला.
- नूरजहाँ गिलगिल,
ज्येष्ठ नागरिक.
कंपनीने आरोग्य शिबिर यशस्वी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, कंपनी यापुढे स्थानिकांच्या सामाजिक हितासाठी मदतीचा हात पुढे करेल. परंतु, यामध्ये कोणाचाही वैयक्तिक स्वार्थ असू नये.
- दीपक शेंडे,
सहाय्यक महाव्यवस्थापक