रत्नागिरीत डाक अदालत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:31 AM2021-03-17T04:31:49+5:302021-03-17T04:31:49+5:30
रत्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या नजीक असलेल्या अधीक्षक डाकघर विभागीय कार्यालयात ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता डाक ...
रत्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या नजीक असलेल्या अधीक्षक डाकघर विभागीय कार्यालयात ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. पोस्टाच्या कामासंबंधीच्या तक्रारींचे निराकरण झाले नसेल अशा तक्रारींची दखल या डाकअदालतीत घेण्यात येणार आहे.
शिधापत्रिका तपासणी
गुहागर : शासनाकडून चालू करण्यात आलेल्या शिधापत्रिका तपासणी मोहिमेला १२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते. त्यामुळे ही मुदत वाढविण्यात आली असून उत्पन्नाच्या दाखल्याची अटही शिथील करण्यात आली आहे.
पोस्टर डिझाईन स्पर्धा
सावर्डे : आझाद हिंद विकास संस्था, रत्नागिरी नेहरू युवा मंच आणि येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पोस्टर डिझाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वच्छ भारत, पर्यावरण संवर्धन, वन्यप्राण्यांचे मानवी जीवनातील महत्त्व असे तीन विषय होते. यात ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.
कांद्याचे दर उतरले
रत्नागिरी : मध्यंतरी शतकी पार केलेल्या कांद्याचे दर आता ४० ते ३५ रुपयांवर घसरले आहेत. त्यातच शहरात कांद्याच्या पोत्यांची विक्री बाहेरून येणारे विक्रेते करू लागले आहेत. त्यांच्याकडून २५ ते ३५ रुपये किलो दराने मध्यमप्रतीचा कांदा मिळत आहे. त्यामुळे सामान्य ग्राहक हा कांदा खरेदी करीत आहेत.
महिलांचा सन्मान
गुहागर : तालुक्यातील जानवळे वाणेवाडी येथील श्री गणेश मंदिरात वाडीतील महिलांचा नुकताच सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांसाठी मनोरंजनात्मक विविध खेळ आयोजित करण्यात आले होते. महिलांची सहकारी वृत्ती, समाज घडविण्यात महिलांचे योगदान आदींबाबत महिलांनी मनोगत व्यक्त केले.
कोविड योद्ध्यांचा सन्मान
खेड : खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ अंतर्गत १४ गाव धामणदिवी गटाच्यावतीने दाभिळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कोविड योद्धा पुरस्काराने पोलीस पाटील, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे खेड तालुकाध्यक्ष राजरत्न तांबे, धामणदिवी गटाचे अध्यक्ष संदीप गमरे तसेच तालुका कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
अंतर्गत रस्त्याला मंजुरी
लांजा : तालुक्यातील रिंगणे अंतोजी वाडी अंतर्गत रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या रस्त्याला आता मंजुरी मिळाली असून भूमिपूजन भाजपच्या महिला नेत्या उल्का विश्वासराव यांच्या हस्ते नुकतेच झाले. अंतर्गत रस्ता नसल्याने ग्रामस्थांना पायपीट करावी लागत होती. आता या रस्त्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
रिटर्न भरण्यासाठी मुदत
रत्नागिरी : वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) वार्षिक रिटर्न भरण्यासाठीची अंतिम मुदत रविवार ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वीही ही मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली होती. आता पुन्हा निवडणूक आयोगाच्या मान्यतेने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
लाकूडतोडीकडे दुर्लक्ष
दापोली : दापोलीत विनापरवाना बेसुमार लाकूडतोड केली जात आहे. मात्र, याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. सध्या प्लँटेशनच्या नावाखाली वनसंपदा नष्ट करण्याचे काम राजरोस सुरू आहे. लाकूडतोड करणाऱ्यांवर वनविभागाने कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी करीत आहेत.
घरगुती गॅसचे दर वाढले
मंडणगड : गेल्या काही दिवसांत घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढू लागल्या असतानाच घरगुती गॅसच्या दरांमध्येही वाढ होऊ लागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडू लागले आहे. महिनाभरात दोनदा दरवाढ झाल्याने पुन्हा दरवाढ होईल का? अशी चिंता गृहिणींच्या मनात निर्माण झाली आहे.