वडिलांच्या नेत्ररूपी अस्तित्वासाठी मरणोत्तर नेत्रदान
By admin | Published: May 27, 2016 10:58 PM2016-05-27T22:58:57+5:302016-05-27T23:12:35+5:30
मरावे परि कीर्तीरूपे उरावे : आंबेशेत येथील सावंत परिवारातील भावंडांनी दिला समाजाला नवा आदर्श
शोभना कांबळे -- रत्नागिरी मरावे परि कीर्तीरूपे उरावे’, या उक्तीच्याही पुढे जाऊन आपल्या वडिलांच्या सामाजिक कार्याच्या कीर्तीबरोबरच त्याच समाजात त्यांचे नेत्ररूपी अस्तित्व ठेवण्यासाठी नजिकच्या आंबेशेत (ता. रत्नागिरी) येथील सावंत परिवारातील भावंडांनी आपल्या वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा घेतलेला निर्णय अवघ्या समाजासाठी आदर्शवत असाच आहे.आंबेशेत येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद विठ्ठल सावंत यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगताना आपल्या नऊ मुलांना अतिशय चांगले शिक्षण दिले. स्वत:ही स्वाभिमानाने जगताना आपली टापटीप रहाणी कायम ठेवली. यासाठी त्यांना बंधू मनोहर सावंत यांचा सदैव हातभार लाभला. आज तीन मुलगे आणि सहा मुली यांचे संसार अतिशय आनंदात सुरू आहेत. सामाजिक कार्यात पूर्वीपासूनच कार्यरत असलेल्या गोविंद सावंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे चिटणीस, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेचे ज्येष्ठ सल्लागार, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (गवई गट) सक्रीय कार्यकर्ते म्हणून काम केले होते. रिपब्लिकन पक्षाचे कोकण प्रदेशाध्यक्ष बी. व्ही. पवार यांचे ते ४० वर्षांपासून स्नेही होते.
गेल्या दोन वर्षांपासून गोविंद सावंत अर्धांगवायूने ग्रस्त होते. हे दुखणे सोसत असतानाच अचानक ‘ब्रेन हॅमरेज’ झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील उपचारांना त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ते कोमात गेले. डॉक्टरांचे प्रयत्न संपले होते. पत्नी आणि मुलांच्या तर आशाच संपल्या होत्या. मात्र, याही कसोटी लागावी अशा क्षणी, बांधकाम क्षेत्रात असलेले त्यांचे चिरंजीव शरद सावंत यांनी महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा निर्धार केला. तो म्हणजे सामाजिक कार्यात शेवटपर्यंत कार्यरत असलेले आपले वडील शेवटपर्यंत नेत्ररूपाने समाजात राहावे, यासाठी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा. आपले वडील आता काही दिवसांचे नव्हे तर क्षणांचे सोबती असल्याच्या जाणीवेने आईसह सर्व भावंडे आधीच कोलमडून पडलेली होती. त्यामुळे त्यांना हा निर्णय सांगणे धाडसाचे होते. पण त्यांनी ते धाडस दाखविले. आई, भावंडांशी चर्चा केली. त्यांच्या मनावर हे बिंबविताना खूप प्रयत्न करावे लागले व ते फलद्रुप ठरले. सर्वांची संमती मिळाली.
अखेर गोविंद सावंत यांचे कोमात असतानाच ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या परिवाराच्या संमतीने त्यांचे नेत्रदान करण्यात आले. वडील जाण्याचे दु:ख होतेच, पण त्यांच्या नेत्रांनी समाजातील आणखी दोन व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश फुलणार असल्याने समाधानही त्यांच्या कुटुंबियांना होते.