पोस्टमनला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:32 AM2021-03-31T04:32:46+5:302021-03-31T04:32:46+5:30
रत्नागिरी : जमिनीच्या वादातून रत्नागिरी तालुक्यातील काळाबादेवी येथे एका पोस्टमनला त्याच्या शेजारी राहणाऱ्या तीन भावांनी शिवीगाळ करत जोरदार धक्काबुक्की ...
रत्नागिरी : जमिनीच्या वादातून रत्नागिरी तालुक्यातील काळाबादेवी येथे एका पोस्टमनला त्याच्या शेजारी राहणाऱ्या तीन भावांनी शिवीगाळ करत जोरदार धक्काबुक्की करून पलायन केले. यामध्ये पोस्टमनच्या डोक्याला दुखापत होऊन ते जखमी झाले. जयसिंग मालगुंडकर असे त्यांचे नाव आहे.
शनिवारी २७ मार्च रोजी सकाळी १०.४५ वाजण्याचा सुमारास ही घटना घडली. जयसिंग विठ्ठल मालगुंडकर(६०, रा. मालगुंडकरवाडी, काळबादेवी) हे पोस्टमन गावात कार्यरत आहेत. २७ मार्च रोजी नेहमीप्रमाणे ते टपाल वाटपाचे काम करत होते. त्यावेळी त्यांचे शेजारी स्वामीनाथ शंकर मालगुंडकर, जिद्दसिंग शंकर मालगुंडकर, रणजितसिंग शंकर मालगुंडकर (सर्व रा. काळाबादेवी) यांनी जयसिंग यांना जोरदार शिवीगाळ केली. स्वामीनाथ मालगुंडकर याने जयसिंग यांना ढकलून दिले. त्या झटापटीत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.
हा प्रकार झाल्यावर स्वामीनाथ, जिद्दसिंग व रणजितसिंग हे तिघेही तेथून पळून गेले. जाताना त्यांनी जयसिंग यांना ठार मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी जयसिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी तिघा भावांविरुद्ध गुन्हा केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद पवार करीत आहेत.