चिंचघरीत ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी डोक्यावर हंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:21 AM2021-06-11T04:21:42+5:302021-06-11T04:21:42+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील चिंचघरी येथील महिलांवर ऐन पावसाळ्यात डोक्यावर हंडा घेण्याची वेळ ओढवली आहे. ग्रामपंचायतीच्या नळ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील चिंचघरी येथील महिलांवर ऐन पावसाळ्यात डोक्यावर हंडा घेण्याची वेळ ओढवली आहे. ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेतील पंपामध्ये बिघाड झाल्याने गणेवाडी व गुरववाडी या दोन वाड्यांमध्ये गेल्या बारा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागत आहेत.
वारंवार कल्पना देऊनही ग्रामपंचायत प्रशासनाने पंप दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने पावसाळ्यातच पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली.
चिंचघरी गणेवाडी क्रमांक १ येथे नळ पाणीपुरवठा योजनेचा पंपहाऊस आहे. बोअरवेलच्या माध्यमातून ही योजना गणेशवाडी क्रमांक १ व गुरववाडीमध्ये राबविण्यात आली आहे. बारा दिवसांपूर्वी या योजनेतील पंप बंद पडला. त्या पंपाची अद्याप दुरुस्ती न झाल्याने गेली बारा दिवस या दोन वाड्यांचा पाणी पुरवठा बंद आहे.
याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी सरपंचांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्याची माहितीही दिली. मात्र आज करू, उद्या करू, लॉकडाऊन आहे अशी उडवाउडवीची उत्तरे ग्रामस्थांना मिळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. खरं तर कडक लॉकडाऊन असला तरी कृषी क्षेत्राशी निगडित दुकानांना परवानगी देण्यात आली होती. याशिवाय पंप दुरुस्त करणारा कारागीरही गावातीलच होता, मात्र तरीही पंपाची दुरुस्ती न झाल्याने ग्रामपंचायत जाणीवपूर्वक ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतेय की काय, असा प्रश्न विचारला जात आहे. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या गैरसोयीची तत्काळ दखल घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ राजेंद्र चाळके, प्रफुल्ल चाळके, किशोर चाळके, दीपक गुरव, शैलेश गुरव, प्रीतेश चाळके, राकेश चाळके, नितेश चाळके, शैलेश चाळके, नानू चाळके, संजय गुरव यांनी केली आहे.