बटाट्याच्या पदार्थांनी खाल्ला भाव!

By admin | Published: December 17, 2014 09:51 PM2014-12-17T21:51:09+5:302014-12-17T23:00:26+5:30

दर वधारला : सामान्यांच्या भोजनातून बटाट्याने केला टाटा..

Potato utensil prices! | बटाट्याच्या पदार्थांनी खाल्ला भाव!

बटाट्याच्या पदार्थांनी खाल्ला भाव!

Next

मेहरुन नाकाडे -रत्नागिरी --कंदमूळ संवर्गात मोडणाऱ्या बटाट्याचा वापर नेहमीच्या भोजनात सर्रास आढळतो. शाकाहारीच नव्हे, तर मांसाहारी जेवणातही बटाटा वापरला जातो. स्नॅक्समध्ये तर बटाटा असतोच असतो. मात्र, गेल्या सहा महिन्यात बटाट्याचा दर चांगलाच वधारला आहे. १२ रूपये किलो दराने मिळणारा बटाटा आता ३५ ते ४० रूपयांवर पोहोचला आहे. बटाट्याचा दर वाढल्यामुळे बटाट्यापासून तयार होणाऱ्या अन्य पदार्थांच्या किमतीतही चांगलीच वाढ झाली आहे.
सर्वसामान्यांच्या ताटात कायम आणि हमखास दिसणारी भाजी म्हणजे बटाटा! मात्र, आता या बटाट्यानेच भाव खाल्ला आहे. बटाट्याचे शेकडो पदार्थ अगदी जिभेवर रेंगाळत राहतात. मात्र, आता बटाट्याचा दर वाढल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या भोजनावर, स्नॅक्सवर झाला आहे. स्नॅक्सने तर आपली दराची उंची गाठलीच आहे.
सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेत बटाट्याचे पीक घेण्यास प्रारंभ झाला. जगभरात १०६.५ मिलियन टनापेक्षा अधिक बटाट्याचे उत्पादन घेण्यात येते. बटाट्याचा वापर अधिक होत असल्यामुळे उत्पादनही वाढत आहे. १० ते १२ रूपये किलो दराने विकण्यात येणारा बटाटा सध्या ३५ ते ४० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. बटाट्याचा दर वाढला असला तरी जेवणातील त्याचा वापर सुरू आहे. मात्र, त्याचे प्रमाण कमी झाले आहे. ‘बटाटेवडा’ तर आबालवृध्दामध्ये प्रसिध्द आहे. याशिवाय उपवासाचे सर्व पदार्थ बटाट्यापासून तयार केले जातात. त्यामध्ये सर्वाधिक खप वेफर्स, फिंगर चीप्स, बटाटा चिवडा यांचा होतो. बटाट्याचा दर वधारल्यामुळे वेफर्स, फिंगर चीप्स, बटाटा चिवडा यांच्या दरात वाढ झाली आहे.
रत्नागिरीत वाशी मार्केट, कोल्हापूर, मध्यप्रदेश येथून बटाटा आयात होतो. ज्योती बटाट्याचा वापर सर्रास होत असलेला दिसून येतो. साडेतीन ते चार किलो बटाट्यामध्ये १ किलो वेफर्स तयार होतात. बटाट्याची साले काढून त्याचे काप करण्यासाठी कटिंग मशीनमध्ये बटाटा घालण्यात येतो. तेथून तो ड्रायर मशीनमध्ये व नंतर बॉयलरमध्ये घातला जातो.
बॉयलरला अर्धा लीटर डिझेल लागते. बॉयलरमध्ये एक किलो वेफर्ससाठी साधारणत: ३०० मिली तेल लागते. तीन मशीन्ससाठी चार कामगार लागतात. सध्या कामगारांना ६ ते १२ हजारापर्यंत पगार दिला जातो. १७ रूपये किलो बटाटे असताना १३० रूपये किलो दराने वेफर्स विक्री करण्यात येत होती. आता ३५ ते ४० रूपये किलो दराने बटाटा घ्यावा लागतो. मात्र, सध्या वेफर्स २२० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. फिंगर चीप्स २२० ते २३० रूपये किलो, तर बटाटा चिवडा २०० ते २५० रूपये किलो दराने सध्या विकण्यात येत आहे.


दररोज चारशे ते साडेचारशे किलो वेफर्स तयार करण्यात येतात. त्यासाठी दिवसाला २५ पोती बटाटा लागतो. त्यासाठी होलसेल मार्केटमधूनच बटाटा मागवला जातो. बटाट्याचा वाढलेला दर, इंधन खर्च, मजुरी, पॅकिंग व अन्य खर्च वजा जाता वेफर्समध्ये फारसे पैसे मिळत नाहीत. मार्केटमधील दर सातत्याने वाढत असतात. परंतु प्रत्येक वेळेस पदार्थांच्या दरात वाढ करणे शक्य होत नाही. त्यामुळे अन्य पदार्थांतून मिळत असलेला फायदा गृहीत धरून वेफर्समध्ये नुकसान सहन करावे लागते.
- सूर्यकांत जाधव, साक्षी फूड्स, रत्नागिरी

Web Title: Potato utensil prices!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.