विद्युत वाहिन्या, खांब जमीनदोस्त; अनेक गाव व वाड्या अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:33 AM2021-05-20T04:33:43+5:302021-05-20T04:33:43+5:30
देवरूख : चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मोहीम महसूल विभागाने हाती घेतली असून, मंगळवारी सायंकाळपर्यंत तालुक्यात विविध ठिकाणी ५३ ...
देवरूख : चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मोहीम महसूल विभागाने हाती घेतली असून, मंगळवारी सायंकाळपर्यंत तालुक्यात विविध ठिकाणी ५३ लाख ७३ हजार ५३७ रुपयांची हानी झाल्याची नोंद देवरूख तहसील कार्यालयात करण्यात आली आहे.
रविवारी झालेल्या चक्रीवादळाने संगमेश्वर तालुक्यात हाहाकार उडविला. गेले तीन दिवस तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. सोसाट्याचा वारा व पावसामुळे झाडे उन्मळून पडणे, झाडांच्या फांद्या कोसळणे असे प्रकार घडले. यामुळे घरे, गोठे, दुकाने, शाळा याबरोबरच विद्युत वाहिन्यांवर झाडे पडल्याने विद्युत वाहिन्या व विद्युत खांब जमीनदोस्त होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. मुख्य मार्गावर झाडे पडल्याने अनेक मार्गांवरील वाहतूक बंद झाली होती. स्थानिक ग्रामस्थ, बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही झाडे बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे.
विद्युत वाहिन्या, खांब जमीनदोस्त झाल्याने अनेक गाव व वाड्या अंधारात आहेत. महावितरणचे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असल्याचे चित्र आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी मेहनत घेत आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत तालुक्यात ३३७ घरे, ३५ गोठे, समाजमंदिर, दुकाने, बुध्दविहार, मंदिरे अशा एकूण २६ ठिकाणची ५३ लाख ७३ हजार ५३७ रुपयांची हानी झाल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. उजगाव येथील संतोष पांचाळ यांच्या गोठ्यावर झाड पडल्याने बैल मृत झाला. नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू असल्याने नुकसानीच्या आकड्यात वाढ होणार आहे. तालुक्यात गेल्या तीन दिवसांमध्ये २१५ मिलीमीटर पाऊस पडल्याची माहिती तहसील काार्यलयातून मिळाली आहे.