जिल्ह्यातील २३ रूग्णालयांतील वीजपुरवठा पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:32 AM2021-05-18T04:32:08+5:302021-05-18T04:32:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तोक्ते वादळामुळे जिल्ह्यातील कोलमडलेली महावितरणची यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी अखंड परिश्रम घेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तोक्ते वादळामुळे जिल्ह्यातील कोलमडलेली महावितरणची यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी अखंड परिश्रम घेत आहेत. वादळी वारे व मुसळधार पावसाचा सामना करत शहरातील मुख्य चार कोरोना रूग्णालये व परिसरातील वीजपुरवठा रविवारी रात्रीपर्यंत सुरळीत करण्यात आला. सोमवारी सकाळपासून सर्व यंत्रणा कामामध्ये जुंपली होती. जिल्ह्यातील एकूण ३९ कोरोना रूग्णालयांपैकी २३ रूग्णालयांतील वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. अद्याप १६ रूग्णालयांतील वीजपुरवठा ठप्प आहे. शिवाय तिन्ही ऑक्सिजन प्लांटमधील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आहे.
चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील एकूण १,२३९ गावांपैकी ७६० गावांमधील वीजपुरवठा ठप्प झाला होता. मात्र, सोमवारी दुपारपर्यंत ४७९ गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यास यश आले. अद्याप २८१ गावांमधील वीजपुरवठा बंद आहे. सोमवारी सकाळपासूनच महावितरणची टीम ग्रामीण तसेच शहरी भागात दुरुस्तीसाठी कार्यरत आहे. टप्प्याटप्प्याने नादुरूस्त वाहिनी, ट्रान्स्फार्मर दुरूस्त करून वीजपुरवठा सुरळीत केला जाणार आहे.
जिल्ह्यातील एकूण ५५ उपकेंद्रांपैकी २७ उपकेंद्र सुरू असून, २८ उपकेंद्र अद्याप बंद आहेत. त्याचबरोबर ७,५४८ ट्रान्सफार्मरपैकी १,८८३ सुरू असून, ५,६६५ ट्रान्सफार्मर बंद आहेत. जिल्ह्यातील एकूण पाच लाख ४५ हजार १२० वीज ग्राहकांपैकी एक लाख ८ हजार ७११ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला असला, तरी अद्याप ३ लाख ५७ हजार ४०९ ग्राहकांचा वीजपुरवठा बंद असल्याने ग्राहकांना सोमवारीही अंधारात राहावे लागले.
एकूण उच्चदाबाचे १६४ व लघुदाबाचे ३९१ वीजखांब जमीनदोस्त झाले आहेत. उच्चदाबाची ४९ किलोमीटरची वाहिनी तर लघुदाबाची ११७ किलोमीटरची वाहिनी नादुरूस्त झाली असून, १५ ट्रान्सफार्मर नादुरूस्त झाले आहेत. वादळी वारे व मुसळधार पावसामुळे महावितरणच्या वीजवाहिन्या, खांब कोसळले आहेत. ट्रान्सफार्मरही नादुरूस्त झाले आहेत. सागरी किनारपट्टीलगतच्या गावांतून जास्त फटका बसला आहे. त्यामुळे नादुरूस्त भागाचा शोध घेत टप्प्याटप्प्याने एकेक भाग दुरूस्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे ९१० व कंत्राटी ३०४ कर्मचारी कार्यरत आहेत. सोमवारी दुपारपर्यंत पाऊस सुरू होता. दुपारनंतर पाऊस कमी झाला असला तरी वारा मात्र कायम होता. तरीही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील होते. कोकण परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, शिवतारे, कैलास लवेकर हे प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाचा आढावा घेत आहेत.