चिपळुणातील २५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:29 AM2021-07-26T04:29:20+5:302021-07-26T04:29:20+5:30
रत्नागिरी : अतिवृष्टी व पुरामुळे चिपळूण शहर व परिसरातील वीजपुरवठा बंद पडला होता. गेले दोन दिवस पावसाने ...
रत्नागिरी : अतिवृष्टी व पुरामुळे चिपळूण शहर व परिसरातील वीजपुरवठा बंद पडला होता. गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने पूरही ओसरला असून, जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. महावितरणची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येत आहे. पुरामुळे ५० हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प होता, मात्र २५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा रविवारी सुरू करण्यात आला आहे.
पुरामुळे ओढवलेल्या परिस्थितीत वीजपुरवठा सुरू करणे अतिशय धोकादायक होते. दोन दिवसात पुराचे पाणी ओसरत चालल्यावर विद्युत यंत्रणेची हानी झाल्याचे निदर्शनास येत आहे. पुरामुळे पन्नास हजार वीजजोडण्या बंद पडल्या होत्या. चिपळूण विभागातील २२४ उच्चदाब आणि १६६ लघुदाबाचे खांब बाधित झाल्याने १९ फीडर बंद पडले आहेत.
कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा वीज यंत्रणा सुरळीत करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. सर्वप्रथम आठ कोरोना रुग्णालयांचा वीजपुरवठा तसेच मुख्य पाणी यंत्रणेचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गती प्राप्त झाली असून, रविवारी रात्री उशिरापर्यंत दोन उपकेंद्रे सुरू करण्याचा मानस मुख्य अभियंता सायनेकर यांनी व्यक्त केला. संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने मुख्य कार्यालय मुंबई येथून विशेष लक्ष पुरविण्यात येत असून, कामात कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे आश्वासन सहमुख्य प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांनी दिले आहे.