मोबाईल चार्ज झाल्यावर वीजपुरवठा होईल बंद, डॉ. विनायक भराडी, संतोष जाधव यांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 05:53 PM2022-04-22T17:53:01+5:302022-04-22T17:55:15+5:30
यासाठी लागणारे हार्डवेअर डॉ. विनायक भराडी यांनी बनविले आहे तर सॉफ्टवेअर प्रा. संतोष जाधव यांनी बनविले आहे. त्यासाठी त्यांनी जर्मन पेटंट कार्यालयाकडे अर्ज केला होता.
रत्नागिरी : फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी विभागप्रमुख डॉ. विनायक भराडी व इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी विभागाचे प्राध्यापक संतोष जाधव यांना जर्मन पेटंट कार्यालयाकडून ‘ऑटोमॅटिकली स्वीचेबल चार्जर’ साठी स्वामित्त्व हक्क (पेटंट) मंजूर झाले आहे.
ज्यावेळी मोबाइल फोन संपूर्ण चार्ज होईल, तेव्हा प्रस्तुत केलेल्या सर्किटकडून विद्युत पुरवठा आपोआप बंद केला जाईल, त्यामुळे विजेची बचत होईल, यासाठी लागणारे हार्डवेअर डॉ. विनायक भराडी यांनी बनविले आहे तर सॉफ्टवेअर प्रा. संतोष जाधव यांनी बनविले आहे. त्यासाठी त्यांनी जर्मन पेटंट कार्यालयाकडे अर्ज केला होता.
या संशोधनामध्ये मुंबईच्या ठाकूर महाविद्यालयातील डॉ. देवेन शाह आणि डॉ. सुजाता अलेगावी आणि ग्रेट ब्रिटन येथील नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीमधील प्रा. भावेश पंड्या आणि डॉ. ओमप्रकाश यांचाही सहभाग होता. हे पेटंट जर्मनी पेटंट कार्यालयामध्ये ‘ऑटोमॅटिकली स्वीचेबल चार्जर’ (Automatically Switchable Charger) या शीर्षकासह मंजूर झाले असून ते नोंदणीकृतही झाले आहे.
डॉ. विनायक भराडी आणि प्रा. संतोष जाधव यांच्या या यशाबद्दल फिनोलेक्स ॲकॅडमीच्या अध्यक्षा अरुणा कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, ॲकॅडमीचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.