प्रभु रामचंद्रांचा फलक अज्ञाताने फाडला, हर्णे पाजपंढरी परिसरात तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 09:34 PM2024-01-24T21:34:34+5:302024-01-24T21:34:42+5:30
दापोली :- हिंदू समाजाद्वारे श्री प्रभु रामचंद्रांचा लावण्यात आलेला फलक अज्ञाताने फाडल्यामुळे हर्णे पाजपंढरी परिसरात एकच तणाव निर्माण झाला ...
दापोली :- हिंदू समाजाद्वारे श्री प्रभु रामचंद्रांचा लावण्यात आलेला फलक अज्ञाताने फाडल्यामुळे हर्णे पाजपंढरी परिसरात एकच तणाव निर्माण झाला होता. सदर घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकरणातील संशयितांना जोपर्यंत पोलीस ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत आम्ही हटणार नसल्याचा पावित्रा उपस्थित जमावाने केल्यानंतर पोलिसांनी अधिकची कुमक मागवली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने संतप्त जमावाला शांत करण्यात यश मिळाले.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या व मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील हर्णे गावामध्ये हिंदू समाजाद्वारे लावलेला राममंदिर प्राणप्रतिष्ठापना शुभेच्छा बॅनर ज्यावर प्रभू रामचंद्रांचा फोटो होता. तो अज्ञात व्यक्तीने फाडल्याचे समजल्यानंतर पाळंदे, हर्णे, पाजपंढरी आदी गावांतील कार्यकर्त्यांना कळल्यानंतर हर्णे बाजारपेठेच्या तोंडावरच त्यांनी जमायला सुरुवात झाली.
मंगळवारी दुपारच्या सुमारास हर्णे नवानगर येथील प्रभू रामचंद्राचा फोटो असलेला बॅनर फाडण्यात आला होता. स्थानिक हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत या प्रकरणावर पडदा टाकला होता. मात्र पुन्हा सायंकाळच्या सुमारास हर्णे नवानगर बसस्थानकाच्या जवळील दुसरा बॅनर फाडला गेल्याने हिंदू समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाले. जोपर्यंत यातील आरोपींना पोलीस शोधून आणत नाहीत, तोपर्यंत येथील जमाव हलणार नसल्याची भूमिका जमावाने घेतल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण झाला. पोलिसांनी वारंवार विनवणी करूनही जमाव शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हता. जमाव आपल्या भूमिकेवर ठाम असतानाच रात्री उशिराने संशयिताना दापोली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आल्याचे पोलिसांकडून उपस्थित जमावाला सांगण्यात आले. संशयित पोलिसांच्या ताब्यात मिळाल्याचे समजताच हर्णेतील जमलेला जमाव शांत झाला.
दरम्यान, या प्रकरणी हर्णैतील दीपक खेडेकर यांनी तीन संशयितांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.