प्रसाद लाड यांची गांधीगिरी, कमी भरपाईचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 04:24 PM2020-07-29T16:24:48+5:302020-07-29T16:25:41+5:30
निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात आलेल्या भरपाईबद्दल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी निषेध म्हणून मुख्यमंत्री यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपारी आणि नारळाची रोपे आणि भरपाईची रक्कम देऊ केली.
रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात आलेल्या भरपाईबद्दल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी निषेध म्हणून मुख्यमंत्री यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपारी आणि नारळाची रोपे आणि भरपाईची रक्कम देऊ केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होत नसल्याने लाड यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे ही रोपे सादर केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी निवेदनही सादर करण्यात आले.
निसर्ग चक्रीवादळात संपूर्ण नष्ट झालेल्या सुपारी झाडाला ५० आणि नारळ झाडाला २५० रुपये प्रतिझाड अशी विशेष बाब म्हणून वाढीव दराने मदत देण्याचा सरकारने निर्णय घेतला, ही क्रूर थट्टा आहे. वर्षानुवर्षे शिवसेनेच्या पाठिशी ठामपणे उभे राहणाऱ्या कोकणवासियांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप लाड यांनी केला.
दिलेली ही झाडे मातोश्रीच्या अंगणात मुख्यमंत्र्यांनी लावावी. त्यांची जोपासना करावी आणि किती खर्च येतो ते पाहावे, असा खोचक संदेशही लाड यांनी यावेळी दिला. गणेशोत्सवासंदर्भात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांबद्दल अद्याप कुठलाच निर्णय होत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
शासनालाच दिले अनुदान
लाड यांनी नारळाची भरपाई २५० रूपये तसेच सुपारीचे ५० रूपये अशी दोन पाकिटे मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे देत शासनाच्या अनुदानाची खिल्ली उडवली.