प्रशांत सावंत यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:34 AM2021-08-19T04:34:19+5:302021-08-19T04:34:19+5:30
वाटूळ : संगमेश्वर तालुक्यातील माखजन गावचे सुपुत्र व सध्या खेड येथे वास्तव्याला असणारे क्रीडारत्न पुरस्कार विजेते राष्ट्रीय खेळाडू प्रशांत ...
वाटूळ : संगमेश्वर तालुक्यातील माखजन गावचे सुपुत्र व सध्या खेड येथे वास्तव्याला असणारे क्रीडारत्न पुरस्कार विजेते राष्ट्रीय खेळाडू प्रशांत महेंद्र सावंत यांची ‘इंटरनॅशनल पॅरा ओपन गेम्स २०२१’ या दिव्यांग खेळाडूंच्या आंतराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झाली आहे. दि. २४ ते २६ ऑगस्ट रोजी मालदीव येथे या स्पर्धा होणार आहेत.
प्रशांत सावंत यांनी गेली दहा वर्षे दिव्यांग खेळाडूंच्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत अनेक पारितोषिके मिळवली आहेत. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दोनशेहून अधिक महिला व पुरुष दिव्यांग खेळाडूंना एकत्र करून दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. दिव्यांग खेळाडूंसाठी ते विविध क्रीडा स्पर्धा व शिबिरांचे आयोजनही करतात. त्यांच्या कामाची दखल घेत शासनमान्य महाराष्ट्र अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या रत्नागिरी शाखेकडून त्यांना ‘रत्नागिरी जिल्हा अपंग गुणिजन’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून ‘जिल्हा गुणवंत खेळाडू’ या जिल्हा क्रीडा पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. कन्झ्युमर राईट्स ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र राज्य यांनीही सावंत यांना ‘राज्यस्तरीय आदर्श क्रीडारत्न’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
आता त्यांची निवड मालदीव येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात झाली आहे. गोळाफेक व थाळीफेक या क्रीडा प्रकारांसाठी त्यांची निवड झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलाच दिव्यांग खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. प्रशांत सावंत यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव सुहास मोरे, जिल्हा दिव्यांग समन्वय समिती जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, अतुल धनवडे, सुनील शिंदे, नारायण मडके, अनिल भेकरे, सचिन खेडेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.