चिपळूणच्या उपसभापती पदासाठी प्रताप शिंदे यांचे नाव जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:30 AM2021-04-06T04:30:37+5:302021-04-06T04:30:37+5:30
चिपळूण : सभापती, उपसभापती निवडीसाठी शिवसेना नेत्यांच्या बैठका झाल्या नव्हत्या. सदस्यांनाही विश्वासात घेतले जात नव्हते. यावरून गदारोळ उठल्यानंतर अखेर ...
चिपळूण : सभापती, उपसभापती निवडीसाठी शिवसेना नेत्यांच्या बैठका झाल्या नव्हत्या. सदस्यांनाही विश्वासात घेतले जात नव्हते. यावरून गदारोळ उठल्यानंतर अखेर उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सदस्यांची सोमवारी बैठक घेण्यात आली. उपसभापतीपदासाठी तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी जाहीर करून इच्छुकांना धक्काच दिला.
माजी सभापती धनश्री शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर सभापती निवडीचा घोळ सुरू होता. शेवटी आमदार शेखर निकम यांनी संयमाने परिस्थिती हाताळत रिया कांबळे यांची सभापतीपदी वर्णी लावली. आता उपसभापतीपद शिवसेनेकडे राहणार आहे. येत्या काही दिवसात ही निवडणूक लागणार आहे. त्यानुसार पाडुरंग माळी यांनीही उपसभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. अशातच शिवसेना सदस्यांना पक्षाची भूमिका समजावी म्हणून माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शहरातील बहादूरशेख नाका येथील पुष्कर सभागृहात शिवसेनेच्या सदस्यांची बैठक घेतली. उपसभापती पदासाठी शिवसेनेतून प्रताप शिंदे, राकेश शिंदे आणि सुनील तटकरे इच्छुक होते. या तिघांची नावे मातोश्रीवर पाठविण्यात आली होती. त्यानुसार पक्षाकडून तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांचे नाव उपसभापतीपदासाठी निश्चित झाले आहे. तसा लेखी आदेश शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत यांनी दिला असल्याचे सदानंद चव्हाण यांनी सांगितले.
उपसभापतीपदासाठी तालुकाप्रमुखांचे नाव निवडणुकीपूर्वीच जाहीर करून या विषयाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या बैठकीत जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी खासदार विनायक राऊत यांनी दिलेल्या आदेश पत्राचे वाचन केले. त्यावर सदस्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाहीत. राकेश शिंदे यांनी तालुकाप्रमुखांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.