शाडूच्या मूर्तीसाठी गणेशभक्तांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:19 AM2021-07-05T04:19:43+5:302021-07-05T04:19:43+5:30
रत्नागिरी : पर्यावरण जनजागृतीमुळे यावर्षीही शाडूच्या मूर्तीला मागणी वाढली आहे. पारंपरिक प्रकारातील मूर्ती घेण्याकडे गणेशभक्तांचा कल ...
रत्नागिरी : पर्यावरण जनजागृतीमुळे यावर्षीही शाडूच्या मूर्तीला मागणी वाढली आहे. पारंपरिक प्रकारातील मूर्ती घेण्याकडे गणेशभक्तांचा कल वाढत आहे. रत्नागिरीकरांना आवडणाऱ्या सिंहासन, चौरंगावर बसलेल्या गणेशमूर्तींना प्रथम पसंती मिळत आहे. कोरोनामुळे शासनाचे नियम पाळताना छोट्या मूर्तींसाठीच अधिक मागणी होत आहे.
गणेश चतुर्थीचा सण दि. १० सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी अद्याप दोन महिन्यांचा अवधी असला, तरी चित्रशाळांमध्ये गणेशमूर्ती रेखाटण्याचे काम सुरू झाले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर त्या पुन्हा पाण्याबाहेर येत असल्याने गेल्या काही वर्षांपासून शाडूच्या गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे.
गणेशमूर्ती प्रामुख्याने शाडूच्या मातीपासून तयार केल्या जातात. ही शाडूची माती गुजरातमधून तर पीओपीपासून मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती बिकानेर, जयपूर (राजस्थान)मधून येते. लॉकडाऊनमुळे यावर्षीसुध्दा वेळेवर मातीचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे काही मूर्तिकारांनी लाल मातीचा पर्याय निवडून लाल मातीपासून मूर्ती तयार करण्यास प्रारंभ केला आहे.
कोेकणात गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येतो. दरवर्षी जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ५८७ ठिकाणी खासगी आणि ११० सार्वजनिक बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येते. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही लॉकडाऊनमुळे अनेक लोक घरात आहेत. सरकारी तसेच खासगी आस्थापनांना लॉकडाऊनचा फटका बसल्याने उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. गणेशमूर्ती रेखाटणाऱ्या कलाकारांची कमतरता भासत असून, इंधन दर मात्र सातत्याने वाढत आहेत.