खासदार राऊत यांच्याकडू्न पूरस्थितीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:31 AM2021-07-29T04:31:23+5:302021-07-29T04:31:23+5:30
राजापूर : गेल्या गुरुवारी तालुक्याच्या पूर्व परिसरात झालेल्या ढगफुटीनंतर अर्जुना नदीला आलेल्या महापुरात दाणादाण उडालेल्या रायपाटण, पाचलसह पूर्व परिसरातील ...
राजापूर : गेल्या गुरुवारी तालुक्याच्या पूर्व परिसरात झालेल्या ढगफुटीनंतर अर्जुना नदीला आलेल्या महापुरात दाणादाण उडालेल्या रायपाटण, पाचलसह पूर्व परिसरातील भागाची शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांनी प्रशासनासह पाहणी केली. या दौऱ्यात नुकसानग्रस्त लोकांना अन्नधान्य पुरविण्यात आले. दरम्यान, रायपाटण गांगणवाडीतील अर्जुना नदीवर नव्याने पूल बांधण्याचे तर संगनाथेश्वर मंदिराच्या बाजूला संरक्षक भिंत बांधण्याबाबतचे ठोस आश्वासन लोकप्रतिनिधींकडून देण्यात आले.
गत आठवड्यात तालुक्याच्या पूर्व परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी झाली. संपूर्ण परिसरात अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याचा दणका मिळाला होता. सलग दोन दिवस संततधार पाऊस पडत होता. त्यामुळे अर्जुना नदीला प्रचंड महापूर आला होता. सपाट परिसर असलेल्या रायपाटण गांगणवाडीत महापुराचे पाणी अनेक घरात घुसून मोठे आर्थिक नुकसान झाले होते. रायपाटणसह पाचल परिसरात झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांनी प्रशासनासह पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांच्यासमवेत तहसीलदार प्रतिभा वराळे, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, विभागीय संघटक उमेश पराडकर, माजी जिल्हा परिषद सभापती शरद लिंगायत, रायपाटणचे शाखाप्रमुख महेश गांगण, महेश ताम्हनकर, तालुका ग्राहक संरक्षक कक्षाचे अध्यक्ष मंगेश पराडकर, अमोल शेट्ये, स्थानिक ग्रामस्थ माजी सरपंच विलास गांगण, माजी शाखाप्रमुख मनोज गांगण, तंटामुक्त अध्यक्ष जनार्दन गांगण यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पाचल येथे पाहणी केल्यानंतर त्यांनी रायपाटण गांगणवाडीला भेट देऊन तेथील पडझडीची पाहणी केली. रायपाटणमधील पुरातन व जागृत संगनाथेश्वर मंदिराला भेट दिली. दरवर्षी महापुरात या मंदिरात पुराचे पाणी भरते व पूजाअर्चा बंद होते. यावेळीही मंदिराच्या छतापर्यंत पुराचे पाणी पसरले होते. या मंदिराच्या पाहणीनंतर मंदिराच्या बाजूला अर्जुना नदीवर संरक्षक भिंत बांधण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही भेटीला आलेल्या लोकप्रतिनिधींनी दिली.
रायपाटण गांगणवाडीकडे जाण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ता बनविण्यात आला असून, मार्गात येणाऱ्या अर्जुना नदीवर कमी उंचीचा कॉजवे बांधण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून पुराचे पाणी वाहत असते. त्यामुळे ग्रामस्थांना गैरसोयींचा सामना करावा लागतो, त्याची दखल घेऊन येथे नव्याने पूल बांधला जाईल, अशी ग्वाही उभय लोकप्रतिनिधींकडून देण्यात आली.