चिपळूणला २० वर्षांनंतर मिळालं नाट्य केंद्र, राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी २५ पासून
By संदीप बांद्रे | Published: November 18, 2023 01:55 PM2023-11-18T13:55:00+5:302023-11-18T13:55:11+5:30
संदीप बांद्रे चिपळूण : काही कारणांमुळे चिपळूणला कोकणातील नाट्य केंद्र म्हणून असलेली ओळख गमवावी लागली होती. पुन्हा २० वर्षांनंतर ...
संदीप बांद्रे
चिपळूण : काही कारणांमुळे चिपळूणला कोकणातील नाट्य केंद्र म्हणून असलेली ओळख गमवावी लागली होती. पुन्हा २० वर्षांनंतर चिपळुणात राज्य नाट्य स्पर्धा आयाेजित करण्यात आली आहे. येत्या २५ नोव्हेंबरपासून ही ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सुरू होणार आहे. ३ डिसेंबरपर्यंत दरराेज सायंकाळी सात वाजता या स्पर्धेतील नाटकांचे सादरीकरण हाेणार आहे.
चिपळुणात पूर्वी अनेक एकांकिका स्पर्धा होत हाेत्या. जवळपास २० वर्षांपूर्वी राज्य मराठी नाट्य स्पर्धेचे केंद्रही या ठिकाणी होत. तेच नाट्य केंद्र दुर्दैवाने तत्कालीन नगर परिषद प्रशासनाने म्हणावे तसे सहकार्य न केल्याने गमवावे लागले होते. त्यानंतर सलग वीस वर्षे रत्नागिरीत राज्य नाट्य स्पर्धा हाेऊ लागल्या. यावर्षी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे यावर्षी चिपळूण येथे राज्य नाट्य स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. पूर्वी राज्य नाट्य स्पर्धेचे बक्षीस वितरण मुंबईमध्ये आयाेजित केले जात हाेते. पहिल्यांदाच ते मुंबई बाहेर चिपळूणमध्ये झाले होतं, हाही एक इतिहास चिपळूणला आहे.
- २५ राेजी - अशुद्ध बीजापोटी (काेतवडे पंचक्राेशी, माजी विद्यार्थी संघ काेतवडे, रत्नागिरी)
- २६ राेजी - कोमल गंधार (कुणबी कर्मचारी सेवा संघ, रत्नागिरी)
- २७ राेजी - परीघ (कै. डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती प्रतिष्ठान, चिपळूण)
- २८ राेजी - दॅट नाईट (राधाकृष्ण कलामंच, रत्नागिरी)
- २९ राेजी - लॉलीपॉप (सहयाेग, रत्नागिरी)
- ३० राेजी - वाटेला सोबत हवी (संकल्प कलामंच, रत्नागिरी)
- १ डिसेंबर - फूर्वझ (श्रीदेव गाेपाळकृष्ण प्रासादिक कलामंडळ, जानशी, राजापूर)
- २ राेजी - सात-बारा (श्री विठ्ठल रुक्मिणी हनुमान मंदिर विश्वस्थ संस्था, रत्नागिरी)
- ३ राेजी - तथास्तु (श्रीरंग, रत्नागिरी)
राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने दर्जेदार नाटके चिपळूणवासीयांना पाहायला मिळणार आहेत. चिपळूण ही सांस्कृतिक राजधानी आहे. इथले सर्वच सांस्कृतिक, नाट्य असे उपक्रम यशस्वी होतात, हे चिपळूणवासीयांनी दाखवून द्यायला हवेत. शिवाय हे केंद्र या ठिकाणी टिकवून ठेवणे, भविष्यातही या ठिकाणी नामवंत संस्थांच्या एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा व्हाव्यात, यासाठी नगर परिषद प्रशासनासह रंगकर्मी, नागरिक या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. - प्रसाद ऊर्फ भाऊ कार्ले, नाट्य कलाकार, चिपळूण.