कृषी विभागाची तयारी
By admin | Published: November 30, 2014 09:48 PM2014-11-30T21:48:32+5:302014-12-01T00:17:13+5:30
जिल्हा परिषद : ४ डिसेंबरपासून शेतकरी मेळाव्यांचे आयोजन
रत्नागिरी : जिल्ह्यात ४ डिसेंबरपासून शेतकरी मेळावे घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये कीटकनाशक हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी दिली.
मेळावा यशस्वी करण्यासाठी कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी, विक्रेते, तालुका कृषी अधिकारी, आंबा बागायतदार संघाचे प्रतिनिधी, पंचायत समितीचा कृषी विभाग तसेच शेतकरी, बागायतदार या मेळाव्यांना उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात ४ डिसेंबरपासून प्रत्येक तालुक्यात मेळावे घेण्यात येणार आहेत. दि. ४ रोजी सकाळी ११ वाजता खेड तालुक्यातील अंजने येथील कान्हेरे सभागृहात आणि गुहागर तालुक्यातील आरे येथील अभिजित भोसले यांच्या बागेत, दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मंडणगड व दापोली या तालुक्यांसाठी केळशी येथील महावीर भवन येथे आणि चिपळूण तालुक्यातील मालदोली ग्रामपंचायत सभागृहात, दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता राजापूर तालुक्यातील कशेळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १मध्ये, दि. ८ रोजी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई ग्रामपंचायत शेजारील गांगण यांच्या निवासस्थानी, दि. ९ रोजी सकाळी १०.३० वाजता जाकादेवी येथील दत्तकृपा मंगल कार्यालय येथे, दि. १० रोजी सकाळी १० वाजता संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी ग्रामपंचायतीशेजारी आणि लांजा तालुक्यातील आगवे ग्रामपंचायत शेजारी जोशी यांच्या बागेत हा मेळावा घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यात आंबा, काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र, या पिकावर तुडतुडे, थ्रीप्स अशांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आंबा, काजूवर औषध फवारणी करण्यात येते. त्यासाठी कीटकनाशक हाताळणीबाबत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दावण्यात येणार आहे. जिल्ह्यात आंबा, काजूवरील फवारणीसाठी जिल्हा परिषदेने २० लाख रुपयांची कीटकनाशक औषधे खरेदी करुन ती शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीवरुन आणखी १० लाख रुपयांच्या औषधांची खरेदी करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. आंबा, काजूवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विद्यापीठाकडून तांत्रिक मार्गदर्शन औषध फवारणीचे व हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व कृषी समितीचे सभापती सतीश शेवडे यांनी केले आहे. (शहर वार्ताहर)
रब्बीची तयारी
जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आवारातील पिकामध्ये भर पडावी व त्यातून नवे तंत्र वापरात यावे हा हेतू.
जिल्ह्यातील शेतकरी मेळाव्यातून प्रबोधनासाठी प्रयत्न करणार.
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रयत्न करणार.
आंबा, काजू पिकावरोबरच अन्य पिकांच्या उत्पादनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन.
रोगप्रतिबंधात्मक उपायांबाबत प्रयत्न.