चिपळुणात कोरोना रुग्णसंख्येच्या दुप्पट, बेडची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:30 AM2021-04-15T04:30:08+5:302021-04-15T16:33:36+5:30
CoronaVirus Ratnagiri: जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत चिपळुणात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. सध्या ४९० रुग्ण उपचार घेत असून, त्यापैकी २६७ जण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. तूर्तास रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्ण संख्येच्या दुप्पटीने बेड आरोग्य यंत्रणेने उपलब्ध केले आहेत. मात्र, रुग्णवाढीची गती लक्षात घेऊन वाढीव बेडसाठी नियोजनही सुरू करण्यात आले आहे.
चिपळूण : जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत चिपळुणात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. सध्या ४९० रुग्ण उपचार घेत असून, त्यापैकी २६७ जण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. तूर्तास रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्ण संख्येच्या दुप्पटीने बेड आरोग्य यंत्रणेने उपलब्ध केले आहेत. मात्र, रुग्णवाढीची गती लक्षात घेऊन वाढीव बेडसाठी नियोजनही सुरू करण्यात आले आहे.
कोरोनामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे तालुक्यात १२० जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस त्याची तीव्रता वाढत आहे. कोरोना रुग्णांबाबत गेल्या काही महिन्यांपासून चिपळूण पूर्णतः स्थिर होते. मात्र, गेल्या काही दिवसांत रुग्णांचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी पेढांबे व गोवळकोट मदरसा येथील बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू केले जात आहे.
दोन दिवसांपासून आरोग्य विभागाने त्याची तयारी सुरू केली आहे. या दोन्ही केंद्रांमध्ये प्रत्येकी १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. पेढांबे येथे चार बेड, तर गोवळकोट येथे सहा ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वहाळ फाटा येथील कोरोना केअर सेंटर येथे ७५ बेड उपलब्ध असून, त्यापैकी ४ ऑक्सिजन बेड आहेत. शिवाय कामथे उपजिल्हा रुग्णालय येथे ११७ बेड असून त्यापैकी ८२ ऑक्सिजन बेड आहेत.
आयू सिद्धी हॉस्पिटलमध्ये ३५ बेडपैकी ४, संजीवनी हॉस्पिटलमधील १४ पैकी ३, सिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये १५ पैकी १५, लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये २५ पैकी २५, श्री हॉस्पिटलमध्ये १४ पैकी २४ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. एकूण सुमारे ५०० हून अधिक बेड तालुक्यात उपलब्ध असून, त्यापैकी १७० बेड तूर्तास ऑक्सिजन बेड म्हणून विविध ठिकाणी उपलब्ध आहेत.
चिपळूण तालुक्यात रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण वाढले असले तरी अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे. भविष्यातील रुग्णसंख्या लक्षात घेऊन आतापासूनच पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यासाठी वहाळ फाटा येथे ७५ बेडचे सेंटर सुरू केले असून, लवकरच गोवळकोट मदरसा व पेढांबे येथे प्रत्येकी १०० बेडचे सेंटर सुरू केले जाणार आहे.
डॉ. ज्योती यादव,
तालुका आरोग्य अधिकारी, चिपळूण.