श्रींच्या आगमनाची चिपळुणात तयारी
By admin | Published: August 26, 2014 09:10 PM2014-08-26T21:10:49+5:302014-08-26T21:51:32+5:30
विविध कार्यक्रम : १२ हजार ५00 मूर्ती
सुभाष कदम - चिपळूण --ढोल - ताशा वाजायला लागला... गणपती नाचायला लागला... गणपती बाप्पा मोरया... अशा जल्लोषात अवघ्या कोकणवासीयांच्या उत्साहाला उधाण आणणारा गणेशोत्सव शुक्रवारी सुरु होत आहे. यावेळी चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ हजार ६५० गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.
चिपळूण शहर परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वरची खेर्डी, खेर्डी बाजारपेठ, बहादूरशेख नाका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण चिपळूण, कापसाळ पाटबंधारे कॉलनी, श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शिवाजी चौक चिपळूण, नगरपरिषद, भाजी मंडई, वेशीचा मारुती, कोकण रेल्वे, चिपळूणचा राजा - शिवाजी चौक, पोलीस लाईन अशा १३ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. कोकणात गणेशोत्सवाचे दिवस मंतरलेले असतात. गणेशभक्तांच्या उत्साहाला यावेळी उधाण आलेले असते. घरोघरी चैतन्यमय वातावरण असते. धूप, सुगंधी अगरबत्त्या यामुळे वातावरण प्रसन्न असते. घरोघरी आरती, भजन व गणेशाची गाणी गायली जातात. १७५ दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. ५ दिवसांचे ७ हजार २५०, तर अनंत चतुर्दशीपर्यंतच्या ५ हजार २२५ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. यावर्षी मंगळवारी गौर येणार असून, बुधवारी ओवसे आहेत. त्यामुळे नवविवाहिता सज्ज झाल्या आहेत. गुरुवारी ५ दिवसांच्या गणेशाचे विसर्जन होईल.
गणेशोत्सव असल्यामुळे बाजारपेठेत गर्दी उसळली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प होत आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भक्तांचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी स्वागत कमान्या आहेत. गावोगावी फ्लेक्सचे फलक झळकताना दिसतात. यावर्षी निवडणूक असल्याने गणेश दर्शनासाठी पुढाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त यंदा विविध पुढारी या उत्सवाला भेट देतील, अशी चिन्हे आहेत.