मतमोजणी प्रक्रियेची रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:23 PM2019-05-03T12:23:17+5:302019-05-03T12:25:06+5:30
निवडणुकीचा मतदानाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता दुसऱ्या महत्वाच्या टप्प्याची, मत मोजणीची तयारी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून सध्या सुरू झाली आहे. मत मोजणी १४ फेऱ्यांमध्ये होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी : निवडणुकीचा मतदानाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता दुसऱ्या महत्वाच्या टप्प्याची, मत मोजणीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सध्या सुरू झाली आहे. मत मोजणी १४ फेऱ्यांमध्ये होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
२३ एप्रिल रोजी रत्नागिरी - सिंधुदुग मतदार संघात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या लोकसभा मतदान संघात चिपळूण, रत्नागिरी, राजापूर तसेच कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी अशा सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे.
मतदानानंतर आता दुसऱ्या टप्प्याची म्हणजेच मत मोजणीच्या प्रक्रियेची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी आता या सहाही विधानसभा मतदार संघांतून अधिकारी - कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात येणार आहे.
पुढच्या आठवड्यात या अधिकारी - कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. मत मोजणीपुर्वी दोन प्रशिक्षणे घेण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणाद्वारे प्रत्यक्ष मत मोजणीच्या अनुषंगांने माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे सध्या कर्मचारी नियुक्तीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.
यावेळीही मत मोजणी १४ फेऱ्यांमध्ये होणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदार संघातील पहिल्या पाच इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीन (इव्हीएम) ची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आठ वाजता मत मोजणीला सुरूवात झाल्यानंतर या सहा मतदार संघातील एकूण ३० मशीन्स तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे यावेळी मोजणीचा कालावधी अधिक वाढणार आहे.
मत मोजणी आता काही दिवसांवरच आली आहे. त्यामुळे मतदानानंतर आता मत मोजणी प्रक्रियाही यशस्वीपणे पार पाडावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासन कामाला लागले आहे.