जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सज्ज ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:33 AM2021-09-19T04:33:05+5:302021-09-19T04:33:05+5:30
रत्नागिरी : ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ...
रत्नागिरी : ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आराेग्य केंद्र सज्ज ठेवण्याची सूचना केली आहे. कोविड सेंटरसाठी जागा उपलब्ध नसेल तरी कमीत कमी १० बेडची सुविधा करण्याची सूचना केली आहे. आराेग्य विभागाने शुक्रवारी घेतलेल्या व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे ही सूचना देण्यात आली.
या ऑनलाईन बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले सहभागी झाले होते. संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता आवश्यकता वाटल्यास जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे आराेग्य केंद्र सज्ज ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या. कोविड सेंटर उभे करण्यासाठी जागा नसेल तर अन्यत्र सोय करा. मात्र, कमीत कमी १० बेडची सुविधा प्राथमिक स्तरावर असली पाहिजे. यासाठी जो निधी लागणार आहे तो निधी केंद्र शासन पुरविणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.