गाव कृती आराखडे १५ ऑगस्टपूर्वी तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:35 AM2021-08-12T04:35:22+5:302021-08-12T04:35:22+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना घरगुती कार्यान्वित नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ...

Prepare village action plans before 15th August | गाव कृती आराखडे १५ ऑगस्टपूर्वी तयार करा

गाव कृती आराखडे १५ ऑगस्टपूर्वी तयार करा

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना घरगुती कार्यान्वित नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. गाव कृती आराखड्यामध्ये प्रत्येक आराखड्यामध्ये प्रत्येक कुटुंबाना समाविष्ट करून त्यांना नळजोडणी देण्यात यावी. त्यासाठी गाव कृती आराखडे १५ ऑगस्टपूर्वी तयार करावेत, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी केली आहे.

ग्रामीण भागात प्रत्येक पात्र कुटुंबाला शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लीटर प्रती दिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध व पुरेसा आणि शाश्वत पाणी पुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे. यामध्ये योजना पूर्ण करणे एवढाच उद्देश नसून कार्यक्षम पाणीपुरवठ्याची एक शाश्वत सेवा उपलब्ध करून देणे आहे.

शासनाच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी पुरवठा मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या माध्यमातून गाव कृती आराखडा पंधरवडा सुरू आहे. हे अभियान कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ‘कोबो कलेक्ट’ या डिजिटल माध्यमाचा उपयोग करून जिल्हा, तालुका व गाव पातळीवर करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशिक्षित मनुष्यबळाच्या समन्वयाने ही गाव कृती आराखड्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

-------------------------------------

तीन टप्प्यांत तयार हाेणार आराखडे

गाव कृती आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा कक्षातर्फे पहिल्या टप्प्यात मंडणगड, दापाेली, राजापूर, दुसऱ्या टप्प्यात संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी व तिसऱ्या टप्प्यात चिपळूण, खेड, गुहागर या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक/ पंप ऑपरेटर, आशासेविका, अंगणवाडी सेविका, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे दोन प्रतिनिधी यांना ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Web Title: Prepare village action plans before 15th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.