Rain: चिपळुणात महामार्गच बनला तलाव!, वाहतूक ठप्प; पावसाचा जोर वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 03:42 PM2022-07-04T15:42:46+5:302022-07-04T15:43:33+5:30
मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागात तुंबलेल्या नाल्यांमुळे जोरदार फटका बसला
चिपळूण : शहरासह तालुक्यात आज, सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसात मुंबई-गोवा महामार्गावर डीबीजे महाविद्यालय परिसरात तीन फुटापर्यंत पाणी साचल्याने चक्क महामार्गावरच तलाव निर्माण झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच वाशिष्ठी नदीतून उपसा केलेला गाळ शहरातील जुना काल भैरव मंदिर परिसरात टाकल्याने येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागात तुंबलेल्या नाल्यांमुळे जोरदार फटका बसला. या पावसात मुंबई-गोवा महामार्गावर डीबीजे महाविद्यालय परिसरात चक्क तीन फुटापर्यंत पाणी साचल्याने महामार्गावरच तलाव निर्माण झाला आहे. अरुंद मोऱ्या टाकल्याने ओझरवाडी येथील डोंगराचे वाहून येणारे पाणी अडते. त्यामुळे याठिकाणी रुंद मोऱ्या उभारण्याची मागणी केली जात होती.
तसेच चौपदरीकरणा अंतर्गत दोन्ही बाजूंनी गटारे उभारली असली तरी परिसरातील सांडपाणी व पावसाच्या पाण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्याचा फटका दरवर्षी बसत असल्याने येथील नागरिकांकडून राष्ट्रीय महामार्ग विभाग व नगर परिषदेला वारंवार निवेदने देण्यात आली. परंतु याबाबत कोणतीही दखल घेतली न गेल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पावसात जुना काल भैरव मंदिर परिसरात टाकलेल्या भरावामुळे मंदिर ते जिप्सी कॉर्नर दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे हाही मार्ग बंद पडला आहे.
दरड कोसळल्याची घटना
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात काही ठिकाणी छोटे-मोठे दगड रस्ता आल्याचे प्रकार सुरु आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाची यंत्रणा घाटात तैनात करण्यात आली आहे. तसेच घाटातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी माती रस्त्यावर आल्याने भीती व्यक्त होत आहे.