रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे राष्ट्रपतींकडून काैतुक, म्हणाले आंब्याचा गाेडवा..
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 02:52 PM2022-02-12T14:52:47+5:302022-02-12T14:53:24+5:30
आंब्याची गाेडीमुळे येथील लाेकांच्या आचरणात गाेडवा आहे, वाणीमध्येही गाेडवा आहे
मंडणगड : आंबा म्हटला की, काेणालाही त्याची भुरळ पडतेच. परदेशापर्यंत जाऊन पाेहाेचलेल्या रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या गाेडव्याचे राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी खास करुन काैतुक केले. रत्नागिरी जिल्ह्यातील हा गाेडवा देशभर पसरावा, असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी आंबडवे येथे काढले.
राष्ट्रपती रामनाथ काेविंद शनिवारी मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे आले हाेते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मनाेगत व्यक्त करताना रत्नागिरीच्या हापूस आंब्याचा आवर्जून उल्लेख केला.
राष्ट्रपती काेविंद म्हणाले की, रत्नागिरीचा विषय निघाल्यावर येथील महान व्यक्तींचे स्मरण हाेतेच. पण येथे आल्यावर एक वैशिष्ट्य जाणवले ते म्हणजे निसर्गत: साैंदर्य. येथील हापूस आंबा प्रसिद्ध आहे. हापूस आंब्याचा गाेडवा केवळ भारत देशातपुरताच मर्यादीत नाही. तर जगातील विविध देशांपर्यंत ताे पाेहाेचला आहे.
हा आंबा आहे कुठला, काेणत्या जिल्ह्यातील आहे? भारतातील आहे पण ताे काेणत्या जिल्ह्यातील आहे, असे विचारल्यावर सांगितले जाते रत्नागिरी जिल्ह्यातील. आंब्याची गाेडी तिथपर्यंत जाऊन पाेहाेचली आहे. आणि येथील लाेकांच्या आचरणात गाेडवा आहे, वाणीमध्येही गाेडवा आहे, असे सांगून रत्नागिरी जिल्ह्याचे काैतुक केले.
ते पुढे म्हणाले की, आज मी संकल्प करताे की, रत्नागिरी जिल्ह्याचा गाेडवा पूर्ण देशात पसरावा. त्या गाेडव्याची सुरुवात राज्यपाल काेश्यारी यांनी केली आहे. त्यांनी जाे पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रपती काेविंद यांनी केले.