रत्नागिरीच्या नगराध्यक्षांनी ग्रामदैवत भैरीसमोर ठेवला राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:00 AM2018-12-22T00:00:35+5:302018-12-22T00:00:41+5:30
रत्नागिरी : दोन वर्षांपूर्वी ठरल्याप्रमाणे रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आपल्या पदाचा राजीनामा शुक्रवारी ग्रामदैवत भैरीसमोर व त्यानंतर जिल्हाप्रमुख ...
रत्नागिरी : दोन वर्षांपूर्वी ठरल्याप्रमाणे रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आपल्या पदाचा राजीनामा शुक्रवारी ग्रामदैवत भैरीसमोर व त्यानंतर जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे सादर केला.
२३ डिसेंबर २०१६ रोजी पंडित यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला होता. दोन वर्षांनंतर आपण या पदाचा राजीनामा देऊ, अशी शपथ त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्या उपस्थितीत भैरी मंदिरात घेतली होती. त्यानुसार त्यांनी प्रथम भैरी मंदिरात आणि नंतर जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला.
शिवसेनेकडून प्रदीप तथा बंड्या साळवी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पंडित राजीनामा देणार आणि साळवी निवडणूक लढवणार, अशी चर्चा आहे. त्याचवेळी पंडित यांना सहा महिने रजेवर पाठवणार आणि त्या काळात बंड्या साळवी यांना उपनगराध्यक्ष करून ते नगराध्यक्षपद सांभाळणार, अशीही चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून मात्र अजून कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. याबाबतचा फैसला शनिवारी खासदारांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे.