आर्मीतून बोलत असल्याची बतावणी, आईस्क्रिम विक्रेत्यास घातला ५१ हजाराचा गंडा; रत्नागिरीतील घटना
By अरुण आडिवरेकर | Published: June 30, 2023 07:14 PM2023-06-30T19:14:09+5:302023-06-30T19:15:41+5:30
आर्मीची पार्टी आहे, असे सांगून तीनशे लोकांसाठी अमेरिकन ड्रायफ्रुट्स आईस्क्रिम हवे आहे असे सांगितले.
रत्नागिरी : आर्मीतून बोलत असल्याची बतावणी करत रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील आईस्क्रिम विक्रेत्याची अज्ञाताने ऑनलाइन ५१ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी गोवर्धन भागू गाडरी (२५, रा. निवळी तिठा, मूळ रा. राजस्थान) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे.
गोवर्धन गाडरी यांचा निवळी तिठा येथे आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय आहे. दि. १९ जून रोजी ते नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात आईस्क्रिम विक्री करत असताना दुपारी ३ च्या सुमारास त्यांना अज्ञाताने फोन केला. यावेळी समोरील व्यक्तिने आपण आर्मीतून मेजर बोलत असून, दि. २० जून २०२३ रोजी रत्नागिरीतील चरवेली येथे आर्मीची पार्टी आहे, असे सांगितले. यावेळी तीनशे लोकांसाठी अमेरिकन ड्रायफ्रुट्स आईस्क्रिम हवे आहे असे सांगितले.
आईस्क्रिम देण्याची ऑर्डर मान्य करत गोवर्धन यांनी आगाऊ रकमेची मागणी केली. मात्र, आर्मीमध्ये गुगल पे, फोन पे चालत नाही. आईस्क्रिम पोच होताच तुमचे पैसे देण्यात येतील, असे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यावर गोवर्धन व त्यांचा मावस भाऊ हे आईस्क्रिम घेऊन चरवेली येथे पोहचले. यावेळी गेटपास तयार करावयाचा आहे, असे सांगून तक्रारदार यांना चरवेली मंदिराजवळ थांबवून ठेवण्यात आले.
ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तिने आमचे कॅप्टन तुमच्याशी बोलणार आहेत, असे सांगितले. यानंतर कॅप्टन म्हणून बोलणाऱ्या व्यक्तिने तक्रारदार यांच्या मोबाइलवर स्कॅनर कोड पाठवून डाऊनलोड करण्यास सांगितले. स्कॅनर डाऊनलोड केल्यानंतर त्यामाध्यमातून आर्मीचे नियम असल्याचे सांगून त्यांनाच पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार गाडरी यांनी ५१ हजार रूपये संबंधित व्यक्तिला ऑनलाइन पद्धतीने दिले. मात्र, त्याबदल्यात त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे गाडरी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे.