भर पावसात सुरू असलेले डांबरीकरण रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:58+5:302021-06-16T04:42:58+5:30
खेड : तालुक्यातील खेड-शिवतर रस्ता रुंदीकरणाचे काम पावसाळ्यात सुरू होते. गेले दोन दिवस भरपावसात संबंधित ठेकेदार हे काम करत ...
खेड : तालुक्यातील खेड-शिवतर रस्ता रुंदीकरणाचे काम पावसाळ्यात सुरू होते. गेले दोन दिवस भरपावसात संबंधित ठेकेदार हे काम करत होता. कोट्यवधी रुपयांचे डांबरीकरणाचे काम पावसात करू नये, अशी ग्रामस्थांची मागणी होती; परंतु ठेकेदाराने आपले काम सुरूच ठेवले होते. अखेर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि विद्यमान सदस्य अरुण कदम यांनी ते काम मंगळवारी बंद पाडले.
जुना खेड - शिवतर रस्ता हा साडेपाच मीटर रुंद आहे. काही ठिकाणी मोऱ्या तुटलेल्या आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूची गटारे ठिकठिकाणी फुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे दीड मीटर रुंदीकरण व डागडुजीसाठी नाबार्डअंतर्गत ४ कोटी ९५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. सन २०१८ - १९ मध्ये या कामाला मंजुरी मिळाली असून, संबंधित ठेकेदाराने हे काम २४ महिन्यांत पूर्ण करणे आवश्यक आहे. या कामाची सुरुवात गेल्यावर्षी करण्यात आली असून, तालुक्यातील ओम कन्स्ट्रक्शन कंपनीने हे काम घेतले आहे. या कंपनीने गेल्या काही महिन्यांत दोन-तीन किलोमीटरचे काम पूर्ण केले आहे; परंतु पावसाळा सुरू झाला तरी उर्वरित डांबरीकरणाचे काम सुरूच आहे.
ज्या ठिकाणी हे काम सुरू आहे, तेथील स्थानिक ग्रामस्थांचा या कामाला विरोध आहे. भर पावसात डांबरीकरण करून कोट्यवधी रुपयांच्या कामाचा विचका होणार असल्याने हा विरोध केला जात आहे, पण ग्रामस्थांच्या सूचनांकडे कानाडोळा करून ठेकेदाराने काम सुरूच ठेवले आहे. रविवारी सकाळी भर पावसात संबंधित ठेकेदाराने डांबरीकरणाचे काम सुरू केले. या दरम्यान मुरडेचे माजी सरपंच दिगंबर दळवी, किरण डफळे, जितेंद्र भिलारे, संदीप कुंभाडकर, अजित जाधव, विजय आंब्रे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. त्यांनी ठेकेदाराला काम बंद करण्याची तंबी दिली. परंतु, ठेकेदाराने त्याकडे कानाडोळा केला. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम यांनी घटनास्थळी येऊन काम बंद करा, अन्यथा स्थानिक ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. भर पावसाळ्यात काम करून कामाची वाट लागेल. कोरोनामुळे शासनाकडून निधी उपलब्ध नाही. विकासकामासाठी आलेल्या निधीची तुम्ही अशी वाट लावू नका, असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर मात्र ठेकेदाराने डांबरीकरणाचे काम बंद करीत त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला.
तीनवेळा पत्र
पावसात डांबरीकरणाचे काम करू नये, यासाठी या ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम खात्याकडून तीन वेळा पत्र देण्यात आले आहे. उर्वरित गटारे, मोरी बांधकाम करावे. मात्र, डांबरीकरण करू नये. अन्यथा बिल अदा करण्यात येणार नाही. असे लेखी स्वरूपात देण्यात आले असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता एन. जी. पावशे यांनी दिली.
काळ्या यादीत टाका
याबाबत मुरडे माजी सरपंच दिगंबर दळवी यांनी कार्यकारी अभियंता उत्तमकुमार मुळे यांच्याकडे पत्र व्यवहार केला असून बांधकाम विभागाच्या पत्राला केराची टोपली दाखवणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.