सोन्याला महागाईची झळाळी, ऐन दिवाळीत ३४ हजारचा आकडा पार करण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 04:29 PM2018-10-24T16:29:23+5:302018-10-24T16:31:39+5:30

रूपयाची घसरण तसेच शेअर मार्केटमध्येही उतार सुरु झाल्याने सोन्याला पुन्हा झळाळी चढू लागली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव ३३ हजार रूपयांपर्यंत पोहोचला असून दिवाळीपर्यंत सोने चौतीसचा आकडा पार करणार असल्याचा अंदाज सुवर्णकारांमधून व्यक्त केला जात आहे.

The price of gold is likely to cross the 34,000 mark in Diwali | सोन्याला महागाईची झळाळी, ऐन दिवाळीत ३४ हजारचा आकडा पार करण्याची शक्यता

सोन्याला महागाईची झळाळी, ऐन दिवाळीत ३४ हजारचा आकडा पार करण्याची शक्यता

ठळक मुद्देऐन दिवाळीत सोन्याला महागाईची झळाळी३४ हजारचा आकडा पार करण्याची शक्यता

रत्नागिरी : रूपयाची घसरण तसेच शेअर मार्केटमध्येही उतार सुरु झाल्याने सोन्याला पुन्हा झळाळी चढू लागली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव ३३ हजार रूपयांपर्यंत पोहोचला असून दिवाळीपर्यंत सोने चौतीसचा आकडा पार करणार असल्याचा अंदाज सुवर्णकारांमधून व्यक्त केला जात आहे.

दिवसेंदिवस रूपयाची घसरण सुरू झाली आहे. त्याचा परिणाम शेअरमार्केटवर झाला आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दराचा आलेख चढता आहे. ३० हजारांपर्यंत असलेला सोन्याच्या तोळ्याचा (१० ग्रॅम) दर आता ३२ हजाराच्या वर पोहोचला आहे.

३ टक्के जीएसटीसह शुद्ध सोन्याला १० ग्रॅमसाठी ३३ हजार ५० रूपये मोजावे लागत आहेत. तर २२ कॅरेट सोन्यासाठी १० ग्रॅमला ३१ हजार ५० रूपये द्यावे लागत आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीचा दर काहीसा स्थिर असून प्रति किलो ४०,४०० रूपये झाला आहे.

दिवाळीपर्यंत शुद्ध सोने ३४ हजारचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ होत असल्याने त्याचा काही प्रमाणावर खरेदीवर परिणाम होणार असून या दिवाळीत काही प्रमाणात सोने कमी खरेदी केले जाण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

दिवाळीनंतर कदाचित सोन्याचा दर कमी होणार असल्याचेही म्हटले जात आहे. यंदा डिसेंबरमध्ये लग्नाचे मुहुर्त आहेत. त्यामुळे दिवाळीत थोडी खरेदी कमी करून ती डिसेंबरमध्ये वाढण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मात्र, ऐन दिवाळीतच सोन्याची झळाळी अधिक असल्याने यावर्षी सणाला सोन्याची खरेदी कमी होण्याची शक्यता आहे.

 

सध्या सोन्याचे दर वाढत आहेत, मात्र, सध्या टीव्हीवर दिवाळीनंतर सोन्याचे दर खाली येणार असल्याची वृत्ते दिली जात आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर सोने कमी होणार आहे. तसेच डिसेंबरमध्ये लग्नाचे मुहुर्त आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर आणखी थोडे दिवस थांबायला काय हरकत आहे, असाही विचार करणारे ग्राहक आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळी सणाच्या खरेदीवर त्याचा थोडाफार परिणाम होण्याची शक्यता आहे.
राजेंद्र भुर्के,
सुवर्ण व्यावसायिक, रत्नागिरी /> 


सध्या रूपयाची घसरण होत आहे, शेअर मार्केट घसरू लागले आहे. त्यामुळे सोन्याचा दर वाढला आहे. सध्या दिवाळीच्या सणादरम्यान तरी हा दर कमी होईल असे वाटत नाही. सणांसाठी काही लोक नेहमीच खरेदी करतात, त्यामुळे या दिवाळीच्या खरेदीवर तितकासा परिणाम होईल, असे वाटत नाही.
- संतोष खेडेकर,
सुवर्णकार, रत्नागिरी
 


सध्या सोन्याचा दर अधिकच वाढत आहे. सध्या ३ टक्के जीएसटीसह शुद्ध सोने ३३ हजाराच्या वर पोहोचले आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत हा दर ३४ हजार रूपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे. याचा परिणाम सणावेळी सोने कमी प्रमाणात खरेदी केले जावू शकते. सोन्याच्या तुलनेने चांदीचा दर मात्र, सध्या स्थिर आहे.
- मोहिनी कारेकर,
सुवर्णकार, रत्नागिरी

Web Title: The price of gold is likely to cross the 34,000 mark in Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.