‘जीएसटी’आधीच दरवाढीचा भडका...
By admin | Published: May 24, 2017 06:11 PM2017-05-24T18:11:00+5:302017-05-24T18:11:00+5:30
घराच्या ग्राहकांना दिलासा नाहीच : बांधकाम साहित्य दरात २५ टक्के वाढ; जीवनावश्यक वस्तूंचे दरही भडकणार!
प्रकाश वराडकर/आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी : दि. २४ :वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) कायदा लागू होण्याआधीच बांधकाम साहित्यासह अनेक क्षेत्रातील साहित्य व सेवा दरांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. घरांच्या किमती वाढू नयेत म्हणून सिमेंट, लेबरवरील कर संपुष्टात आणूनही सिमेंटच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. घरांसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टीलच्या दरातही २५ टक्के वाढ झाली आहे. जीएसटीचा फायदा घेत जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीही भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.
जीएसटी विधेयक राज्याच्या विधानसभेत मंजूर झाल्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात स्वस्ताई येणार असल्याचा दावा केला होता. मात्र, हे विधेयक मंजूर होण्याआधीच बांधकामाशी संबंधित उत्पादनांच्या किमतीत २५ ते ३० टक्के दरवाढ करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच ही दरवाढ झाली आहे. विविध कंपन्यांची सिमेंट पोती १५ दिवसांपूर्वी २९० ते ३०० रुपयांना विकली जात होती. मात्र, जीएसटी लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सिमेंटच्या गोणीचा दर थेट ३८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
स्टीलच्या किलो दरातही २५ टक्के दरवाढ झाली आहे. आधी प्रतिकिलो स्टीलचा ३५ रुपये असणारा दर आता ४३ ते ४५ रुपयांवर पोहोचला आहे. मान्सून जवळ आलेला असताना बांधकाम साहित्याच्या किमतीत वाढ झालेली याआधी कधी दिसून आली नाही. शासनाने बांधकामविषयक काही नियमांतही आधीच बदल केले आहेत. त्यानुसार यापुढे बिल्टअप एरिया गृहीत न धरता कार्पेट एरियावरच सदनिका विक्री करावी, असा निर्णय झाला आहे. त्यामुळे कार्पेट एरियासाठी प्रतिचौरस फूट दर हे बिल्टअप एरिया धरूनच ठरविले जाणार आहेत. त्यामुळे घरांच्या ग्राहकांना कोणताही दिलासा त्यातून मिळणार नाही.
जीएसटीआधीच दरवाढ का? : आयुष्यभर बॅँकांचे हप्तेच भरणार?
सिमेंटसह बांधकाम साहित्य व अन्य वस्तूंच्या झालेल्या दरवाढीबाबत काही कंपन्यांच्या विक्री प्रतिनिधींना विचारले असता त्यांच्याकडून धक्कादायक माहिती पुढे आली. जीएसटीनंतर दरवाढ झाली तर जनतेकडून अधिक ओरड होईल. त्यामुळे त्याआधीच दरांची लेव्हल केली जात आहे, अशी प्रतिक्रिया काही प्रतिनिधींनी दिली. मुळातच घरांच्या किमती वाढू नयेत, म्हणून सरकारने सिमेंट व लेबर यावरील कर संपुष्टात आणले आहेत. असे असताना जीएसटीनंतर सिमेंटचे दर कसे काय वाढणार, असाही सवाल केला जात आहे. त्यामुळे जीएसटीचे निमित्त करीत सिमेंट कंपन्यांनी भरमसाठ दरवाढ करून आपले उखळ पांढरे केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
जीएसटी लागू होण्याआधीच बांधकाम साहित्याचे दर भडकल्याने घर पहावे बांधून... असे म्हणत घर बांधणाऱ्यांना यापुढे पोटाला चिमटा काढून विकत घेतलेल्या घरांचे हप्तेच त्यांच्या उत्पन्नातून आयुष्यभर भरत राहावे लागणार आहेत. बॅँकांकडून मोठ्या रकमेची कर्जही दिली जाणार आहेत. कोणालाही स्वकमाई करून घर विकत घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे बॅँकांकडेच कर्जासाठी हात पुढे करावे लागणार आहेत. हे घराचे कर्ज फेडण्यासाठी आयुष्यभराच्या उमेदीच्या काळातील मौल्यवान श्वास खर्ची घालावे लागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.