शाळा पुन्हा गजबजल्या, योग्य खबरदारी घेत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 06:59 PM2021-12-01T18:59:50+5:302021-12-01T19:00:40+5:30
गेले दोन वर्ष कोरोनामुळे बंद असलेल्या प्राथमिक शाळा आज, बुधवारपासून पुन्हा गजबजल्या. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जंगा स्वागत करण्यात आले.
रत्नागिरी : गेले दोन वर्ष कोरोनामुळे बंद असलेल्या प्राथमिक शाळा आज, बुधवारपासून पुन्हा गजबजल्या. त्यामुळे दोन वर्ष सक्तीच्या सुटीवर असलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शाळा सुरू झाल्याने आनंद दिसत होता. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती.
रत्नागिरी शहरातील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर विद्यामंदिरात फुग्यांची कमान लावून मुलांचे स्वागत करण्यात आले. तर काही शाळांमध्ये मुलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारवर मुलांचे तापमान तपासूनच मुलांना सोडण्यात येत होते. मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांनीही गर्दी केली होती. मात्र, पालकांना प्रवेशद्वारवरच थांबविण्यात आले होते. कोरोनाचे नियम पाळून मुलांना प्रवेश देण्यात येत होता. मुलांनीही मास्क लावून शाळेत प्रवेश केला.
शाळा सुरु होणार म्हणून विद्यार्थी खूश होते. दोन वर्षांनी शाळेचा परिसर पाहताच मुले आनंदीत झाली होती. मात्र कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे शाळा प्रशासनाला विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी लागणार आहे.