तुरुंग अधिकाऱ्यांनी चार महिन्याच्या चिमुकलीला वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:28 AM2021-07-26T04:28:42+5:302021-07-26T04:28:42+5:30
रत्नागिरी : चिपळूण येथे पुराचा वेढा वाढताच परिसरातील नागरिकांना वाचविण्यासाठी नातेवाईकांनी सोशल मीडियावरून संदेश पाठवायला सुरूवात केली. नेटवर्कअभावी प्रशासनाची ...
रत्नागिरी : चिपळूण येथे पुराचा वेढा वाढताच परिसरातील नागरिकांना वाचविण्यासाठी नातेवाईकांनी सोशल मीडियावरून संदेश पाठवायला सुरूवात केली. नेटवर्कअभावी प्रशासनाची हेल्पलाईन बंद असल्याने अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक मिळवत मदतीची याचना सुरू केली. जिल्हा विशेष कारागृहात कार्यरत असलेल्या अमेय पोतदार यांनी सहकाऱ्यांसह चिपळूण येथे जाऊन रेस्क्यू ऑपरेशन करत चार महिन्याच्या चिमकुलीला वाचविले.
कारागृहातून ड्युटी संपवून गुरूवारी सायंकाळी घरी आल्यानंतर तुरूंग अधिकारी अमेय पोतदार यांच्या मोबाईलवर मदतीचे असंख्य संदेश येत होते, त्यातच सारखे फोनही सुरू होते. लोक पुरामुळे प्रचंड घाबरल्याने मदतीची याचना करत होते. मात्र, आलेला प्रत्येक फोन उचलून घाबरू नका, आम्ही मदतीला पोहाेचत आहोत, प्रशासनाकडून मदत होणार आहे, असा धीर देत होते. त्यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग व अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधून रेस्क्यूला येण्याची विनंती केली. त्यांनीही परवानगी दिली. तातडीने पोतदार यांनी सचिन शिंदे, स्वप्नील गावखडकर, सुरज शिंदे यांच्यासह चिपळूणकडे रवाना झाले. त्यांनी नेवरे येथून काैशल फाळके यांची छोटी बोट घेतली. ही बोट नेण्यासाठी दीपक पवार यांनी वाहन उपलब्ध केले. बावनदी पुलावर पाणी असल्याने भातगावमार्गे चिपळूणला पोहाेचण्यासाठी पहाटेचे ४ वाजले. पाणी हळूहळू ओसरत होते.
चिपळूण शहरातील अनेक लोक इमारतीच्या गच्चीवर अडकले होते. मुरादपूर, पेठमाप, बाजारपेठ, मार्कंडी परिसरातील अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहाेचविण्यात आले.
त्यातच मार्कंडी येथे एक दाम्पत्य चार महिन्याच्या चिमुकलीसह टेरेसवर अडकले होते. इमारतीचे दोन्ही मजले पाण्याखाली होते. या इमारतीच्या गच्चीवर अनेक लोक अडकलेले होते. त्यांनीही अन्यत्र नातेवाईकांकडे सुरक्षितस्थळी जाण्याची इच्छा व्यक्त केली. हळूहळू सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून बोटीच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी हलविले. त्याचवेळी चार महिन्याच्या चिमुकलीला पोतदार यांनी कुशीत घेऊन पाण्यातून मार्ग काढत त्यांच्या पालकांसह शिवाजीनगर येथील नातेवाईकांकडे सुरक्षित पोहोचविले.
शुक्रवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन करून पोतदार सहकाऱ्यांसह रत्नागिरीकडे रवाना झाले.