कोकणात दुग्ध उत्पादनासाठी खासगी क्षेत्राला मोठी संधी
By admin | Published: February 18, 2016 12:01 AM2016-02-18T00:01:47+5:302016-02-18T21:16:15+5:30
कोकणात दुग्ध उत्पादनासाठी खासगी क्षेत्राला मोठी संधी : बागडे
प्रकाश वराडकर -- रत्नागिरी --कोकणात दुग्ध उत्पादनासाठी खासगी क्षेत्रात मोठी संधी आहे. या व्यवसायासाठी गाई, म्हशींना वर्षभर पुरेल इतका मुबलक चारा येथे आहे. दुधाच्या विक्रीसाठीही कोकण हीच मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायातून सुबत्ता मिळविण्यासाठी कोकणात प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत राज्य विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. गुहागर येथील महाविद्यालयाच्या गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष बागडे हे रत्नागिरी दौऱ्यावर आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौरा झाल्यानंतर ते बुधवारी सायंकाळी ३.३० वाजता रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे आले होते. त्यांनी येथील भाजप कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश शेवडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नाना शिंदे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बागडे यांनी त्यांचे भाजपमधील जुने संघटक मित्र शरद कुलकर्णी यांच्या रत्नागिरी शांतीनगर येथील घरी जाऊन अल्का शरद कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली.
सरकारने उद्योग उभारावेत, ही मानसिकता आता जनतेने सोडून द्यावी. मात्र, पायाभूत सुविधा शासनाकडून नक्कीच पुरविल्या जात आहेत. खासगी क्षेत्रातील अनेक उद्योग हे चांगल्या प्रकारे वाटचाल करीत आहेत. त्यामुळे खासगी क्षेत्रातील उद्योगांचेही डोळसपणे स्वागत व्हायला हवे, असे बागडे म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहताना नेमका काय अनुभव आला, असे विचारता सभागृह चालविणे अध्यक्ष म्हणून जबाबदारी असते. विरोधी पक्ष व सरकार यांच्यात सांगड घालणे हे माझे काम आहे. विरोधकांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीने पाहावे लागते. विरोधकांच्या सहकार्याशिवाय सभागृह चालविता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट
केले.
या दौऱ्यात आपण मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू प्रकल्पांची पाहणी केली. देवगड येथील गोगटे यांनी उभारलेला फळप्रक्रिया प्रकल्प तसेच बेबीकॉर्न प्रकल्पाचीही पाहणी केल्याचे ते म्हणाले.
शाळा चांगल्या कोणत्या?
खासगी क्षेत्रातील उद्योगांबाबत बोलतानाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या शाळांच्या चांगल्या कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले. सध्या खासगी शाळा चांगल्या की, सरकारी शाळा चांगल्या, असा वादाचा विषय होऊ शकतो, असे ते म्हणाले.
कॅगच्या अहवालात २०११-१२मध्ये शासनाच्या शाळांमधील ६ लाख विद्यार्थी कमी झाले, तर संस्थांच्या शाळांतील २ लाख विद्यार्थी कमी झाल्याचे म्हटले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पगार आहे. तरीही ही स्थिती आहे, असे सांगून याबाबत हरिभाऊ बागडे यांनी खंत व्यक्त केली.
कमी पटसंख्येच्या सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळाही खासगी शिक्षण संस्थांकडे दिल्यास या शाळा चांगल्या चालतील. त्या शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांनाही खासगी संस्थांकडून सामावून घ्यावे लागेल. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषदेकडून तसा ठराव करून घ्यावा लागेल. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने असा प्रस्ताव पालिकेकडे दिला असल्याचे सोसायटीच्या उपकार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन यांनी निदर्शनास आणून दिले.
काही जिल्ह्यात दुग्ध उत्पादनासाठी गाय, म्हशींना आवश्यक चाराही पुरेसा उपलब्ध नाही. चारा छावण्यांचा वापर केला जातो. आमच्या भागातील या व्यवसायात असलेल्या लोकांना जनावरांना चाऱ्यासाठी विदर्भात न्यावे लागते. तरीही हा व्यवसाय केला जातो. कोकणात तर या व्यवसायासाठी सर्वकाही येथेच आहे, असे बागडे म्हणाले.