रासायनिक सांडपाण्याचा प्रश्नही न सुटणाराच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:33 AM2021-04-09T04:33:17+5:302021-04-09T04:33:17+5:30
सुनील आंब्रे लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : लोटे औद्योगिक वसाहतीसमोर केवळ स्फोट व आगीच्या घटनांचीच समस्या नाही, तर येथील ...
सुनील आंब्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
आवाशी : लोटे औद्योगिक वसाहतीसमोर केवळ स्फोट व आगीच्या घटनांचीच समस्या नाही, तर येथील रासायनिक सांडपाण्याचा प्रश्नही अजून निकाली निघालेला नाही. कंपन्यांनी कधी त्यांच्या आवाराबाहेर, कधी नाल्यात, तर कधी खाडीच्या पाण्यात रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले आहे. त्यामुळे जलचर सृष्टीला धक्का बसला आहेच, शिवाय शेती, बागायतीवरही त्याचा परिणाम झाला आहे. रासायनिक द्रव्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्याही अनेकदा उद्भवली आहे. पाण्याचे अनेक स्रोत नष्ट झाले आहेत.
लोटे औद्योगिक वसाहत रासायनिक उद्योगांसाठी म्हणूनच प्रसिद्ध आहे. मात्र, त्यामुळे या वसाहतीच्या सुरक्षेचा प्रश्न आतापर्यंत अनेकवेळा निर्माण झाला आहे. आजवरचे स्फोट आणि अपघात हा जितका चिंतेचा विषय आहे, तेवढाच चिंतेचा विषय म्हणजे रासायनिक सांडपाणी. येथील कंपन्यांनी आपले रासायनिक सांडपाणी हे प्रक्रिया केंद्राकडेच देणे अपेक्षित आहे. तेथे या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते हानिकारक होणार नाही, इतक्या स्तरावर आणणे अपेक्षित आहे. कंपनीकडून दिले जाणारे सांडपाणी कसे असावे, त्यात काय घटक असावेत, काय असू नयेत, याबाबत निकष आहेत. मात्र, निकष बाजूला ठेवून काही कंपन्या सांडपाणी थेट सोडून देतात.
आतापर्यंत सांडपाण्यामुळे नदी, नाले, खाडीतील मासे इतर जलचर, जनावरांचा मृत्यू झाला आहे. या पाण्यामुळे शेती, फळबागांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी भातशेती पूर्ण संपूनच गेली आहे. रासायनिक सांडपाण्याचा खूप मोठा उपद्रव म्हणजे पाण्याचे स्रोत खराब किंवा नष्ट होणे. हा प्रकार परिसरात अनेक ठिकाणी झाला आहे. त्याबाबत अनेकदा ओरडही करण्यात आली आहे. मात्र, संबंधित यंत्रणांनी त्याची फार गांभीर्याने दखल घेतलेली नाही. रासायनिक सांडपाणी नाल्यात जाणे किंवा सोडले जाणे, एमआयडीसीचे चेंबर ओव्हर फ्लो होणे, सीईटीपीमधून सांडपाणी थेट खाडीत जाणे हे प्रकार केवळ पावसाळ्यातच नाही तर वर्षभरात कधीही होतात.
रासायनिक सांडपाण्याप्रमाणेच वायूगळती हाही लोटे परिसराला मिळालेला एक शाप आहे. वायूगळतीमुळे कामगार दगावल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. त्याचबरोबर नजीकच्या वस्तीला त्याचा त्रास होण्याचा प्रकारही अनेकदा झाला आहे. सुप्रिया लाईफसायन्सेस, एक्सेल इंडस्ट्रीज, युएसव्ही, कन्साई नेरोलॅक, रिव्हरसाईड, गोदरेज ॲग्रोव्हॅट, रॅलिज इंडिया, दीपक नोव्हाकेम, उर्ध्वा केमिकल्स या व अन्य काही कंपन्यांमधून वायूगळतीचे अपघात घडले आहेत.
२००२मध्ये घरडा केमिकल्सच्या वायूगळतीमुळे आवाशी येथील प्राथमिक शाळेतील ४५ मुलांना बाधा झाली होती. मोरॅक्स ही कंपनी वायूगळतीने आग लागून पूर्णपणे बेचिराख झाली होती.
सातत्याने होणाऱ्या वायूगळतीमुळे येथील रहिवाशांना विविध आजारांनी ग्रासले आहे. कर्करोग, दमा, टी.बी. यासारखे आजार या भागात वाढत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. स्फोट आणि आगीइतकेच गंभीर परिणाम वायूगळती आणि रासायनिक सांडपाण्यामुळे झाले आहेत.