अतिक्रमणाचा प्रश्न न सुटलेला जवान रजा न वाढवता निघाला काश्मीरकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 07:53 PM2019-02-18T19:53:23+5:302019-02-18T19:55:32+5:30
चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे आपल्या जागेत ग्रामपंचायतीने केलेले रस्त्याचे अतिक्रमण बाजूला करण्यासाठी सुट्टीवर आलेले सुभेदार विनोद कदम जागेचा प्रश्न अजूनही न सुटल्याने आपली रजा वाढवणार होते. मात्र, पुलवामा येथे झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांनी रजा वाढवण्याचा मुद्दा बाजूला ठेवला आहे.
मनोज मुळ््ये
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे आपल्या जागेत ग्रामपंचायतीने केलेले रस्त्याचे अतिक्रमण बाजूला करण्यासाठी सुट्टीवर आलेले सुभेदार विनोद कदम जागेचा प्रश्न अजूनही न सुटल्याने आपली रजा वाढवणार होते. मात्र, पुलवामा येथे झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांनी रजा वाढवण्याचा मुद्दा बाजूला ठेवला आहे.
माझ्या जागेच्या समस्येपेक्षा देशासमोरील समस्या मोठी आहे आणि मला तेथे जाणे आवश्यक आहे, असे सांगत त्यांनी काश्मीरकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या जम्मू-काश्मीर सीमेवर तैनात असलेल्या सुभेदार विनोद कदम यांची चिपळूण कळंबस्ते येथे सहा गुंठे जागा आहे. त्यांच्या घराशेजारी माजी सैनिक शांताराम शिंदे यांचे घर आहे. शिंदे यांच्या घरापर्यंत एका बाजूने डांबरी रस्ता उपलब्ध आहे. मात्र, गावातील राजकारणातून तो सध्या बंद आहे. आपल्याला रस्ता मिळावा, या मागणीसाठी शिंदे यांनी २६ जानेवारीला उपोषणाची नोटीस दिली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने घाईघाईने शिंदे यांना विनोद कदम यांच्या जागेतून रस्ता दिला. त्यासाठी विनोद कदम यांची संमती घेतली गेली नाही.
हा प्रकार कळल्यानंतर विनोद कदम ३ फेब्रुवारीला काश्मीरमधून रत्नागिरीत दाखल झाले. ४ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे आपली तक्रार मांडली. जिल्हाधिकारी यांनी चिपळूण उपविभागीय अधिकाऱ्यांना या विषयात लक्ष घालण्याचे आदेश दिले. मात्र, दि. ५ फेब्रुवारीलाच कदम यांनी आपल्या जागेला घातलेले कुंपण ग्रामपंचायतीने तोडून नेले. त्यामुळे कदम यांनी ६ फेब्रुवारीला पुन्हा जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.
झालेला प्रकार पुन्हा त्यांच्या कानावर घातला. त्यांनी पंचायत समितीच्या गट विस्तार अधिकाऱ्यांना तत्काळ दूरध्वनी करून जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले. मात्र, ६ फेब्रुवारीपासून अजूनपर्यंत याबाबत पुढे कारवाई झालेली नाही.
सुभेदार कदम १६ फेब्रुवारीपर्यंत रजा घेऊन आले होते. मात्र, अजूनही प्रश्न न सुटल्याने ते रजा वाढवून घेणार होते. त्याचदरम्यान, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. ही बातमी समजताच कदम यांनी रजा वाढवण्याचा विचार रद्द केला आहे.
जागेच्या प्रश्नासाठी गेले काही दिवस फिरतोच आहे. मला तेवढ्यासाठी नंतर परत यावे लागले तरी चालेल, पण आता माझ्या जागेपेक्षा देशासमोरील समस्या मोठी आहे आणि सैनिक म्हणून मला माझे कर्तव्य बजावण्यासाठी जायलाच हवे, असे कदम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. त्यामुळे ते शनिवारी मुंबईकडे रवाना होणार आहेत.
जवानांना महत्त्व शहीद झाल्यावरच?
काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र हळहळ, शोक, सहानुभूती अशा भावना व्यक्त होत आहेत. जवानांचे महत्त्व फक्त ते शहीद झाल्यावरच समजते का? हयात असलेल्या आणि देशासाठी लढणाऱ्या जवानाचे दु:ख, त्याचा त्रास कोणाला समजत नाही का? असे प्रश्न कदम यांच्या प्रकरणावरून पुढे येत आहेत.
सीमेवर गस्त घालण्याऐवजी कदम सरकारी कार्यालयांमध्ये फेऱ्या मारत आहेत आणि अजूनही त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. आता देशाची गरज म्हणून ते परत सीमेवर निघाले आहेत. मात्र, प्रशासनाने कारवाई केलीच नाही तर त्यांना पुन्हा रजा घेऊन देशाच्या नाही तर घराच्या सीमांची काळजी करत बसावी लागेल.