चिपळुणातील सार्वजनिक शौचालयांची समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:33 AM2021-07-30T04:33:21+5:302021-07-30T04:33:21+5:30

चिपळूण : महापुरात घर, इमारती व सार्वजनिक मालमत्तेला मोठा फटका बसला आहे. याचबरोबर शहरातील नगर परिषदेच्या सार्वजनिक शौचालयांचेही मोठे ...

The problem of public toilets in Chiplun is serious | चिपळुणातील सार्वजनिक शौचालयांची समस्या गंभीर

चिपळुणातील सार्वजनिक शौचालयांची समस्या गंभीर

Next

चिपळूण : महापुरात घर, इमारती व सार्वजनिक मालमत्तेला मोठा फटका बसला आहे. याचबरोबर शहरातील नगर परिषदेच्या सार्वजनिक शौचालयांचेही मोठे नुकसान झाले आहे. शहरातील ५० शौचालये निकामी झाली असून, त्यांतील तीसहून अधिक पूर्णतः कोसळली आहेत.

दोन वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील बहुतांशी शौचालये व स्वच्छतागृहांची दुरुस्ती व नूतनीकरण केले गेले. याशिवाय या वर्षी शहरातील प्रत्येक प्रभागात नवीन शौचालय उभारण्यात आले असून, त्यासाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत. यातील काही शौचालये २२ ते २८ लाख रुपये खर्चातून उभारले आहेत. त्यामुळे चिपळुणातील शौचालयांचा मुद्दा वादग्रस्त ठरला होता. त्यावरून विरोधी गटातून आरोपही केले जात होते. आता याच शौचालयांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. महापुरामुळे इतर मालमत्तांप्रमाणेच या सार्वजनिक शौचालयांचेही मोठे नुकसान झाले आहे.

शहरात एकूण ७४ सार्वजनिक शौचालये आहेत. त्यावर शहरातील सुमारे चार हजारांहून अधिक नागरिक अवलंबून आहेत. शहरातील गोवळकोट, पेठमाप, मुरादपूर, शंकरवाडी, बाजारपेठ, कावीळतळी, पागगमळा, बहादूर शेख नाका, वडार कॉलनी, राहुल गार्डन या भागांतील सार्वजनिक शौचालये पूर्णतः निकामी झाली आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. याविषयी तातडीने उपायोजना होण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्याकडे निधीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार लवकरच या कामासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

................

प्रत्येक ठिकाणी मोबाईल शौचालय

शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली असल्याने त्या त्या भागात मोबाईल शौचालय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेची मदत घेण्याचा विचारही केला जात आहे. नगर परिषदेकडूनही त्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. तूर्तास शहरातील या समस्येकडे प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

............

गृह शौचालये फायदेशीर

स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त शहर म्हणून चिपळूणची ओळख आहे. या उपक्रमांतर्गत शहरात सुमारे ५०० हून अधिक गृह शौचालये उभारण्यात आली. त्यासाठी संबंधित कुटुंबीयांना प्रतिशौचालयास २२ हजारांचे अनुदान देण्यात येते. आता पूर परिस्थितीत याच गृह शौचालयांचा शहरातील नागरिकांना उपयोग होत आहे.

Web Title: The problem of public toilets in Chiplun is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.