धरणापासून रोजगारापर्यंत समस्याच

By admin | Published: November 19, 2014 09:14 PM2014-11-19T21:14:44+5:302014-11-20T00:00:39+5:30

राजापूर तालुका : विकासाकडची वाटचाल ठरतेय अडथळ्यांची शर्यत

Problems from dam to employment | धरणापासून रोजगारापर्यंत समस्याच

धरणापासून रोजगारापर्यंत समस्याच

Next

विनोद पवार - राजापूर -तळकोकणातील इतिहासाशी संबंधित व तेवढेच महत्त्वाच्या ठरलेल्या राजापूरची वाटचाल मात्र तेवढी समाधानकारक नाही. अनेक वर्षे सत्तेच्या विरोधातील आमदार लाभल्याने विकासकामे मार्गी लावताना मर्यादा येतात. पाणीटंचाईपासून रखडलेल्या धरण प्रकल्पापर्यंत, तर नदीपात्रातील गाळापासून रोजगारापर्यंतच्या विविध समस्या आजही भेडसावत आहेत. नवीन सरकारला हे मोठे आव्हान ठरणार आहे.
एकूण १०१ ग्रामपंचायतींसह २४० महसुली गावे व राजापूर शहर असा राजापूर तालुका आहे. पूर्वेकडे सह्याद्रीला जाऊन भिडणाऱ्या तालुक्याचे दुसरे टोक पश्चिमेकडे समुद्राला मिळते. एवढी त्याची विशाल व्याप्ती आहे. राजापूर नगर परिषदेमधील १७ नगरसेवक, ६ जिल्हा परिषद विभाग व बारा पंचायत समिती प्रभाग असा राजापूरचा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार आहे. त्यामुळे एवढ्या विस्तीर्ण तालुक्याचा कारभार म्हणजे मोठे आव्हान असताना मागील काही वर्षात इथल्या लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला ते पेलताना कमालीची कसरत करावी लागत आहे.
दरवर्षी राजापूर तालुक्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मागील दशकाचा कालखंड नजरेपुढे घेतल्यास साधारणत: २० ते ३० गावे व ५० ते ६० वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. त्यासाठी तालुक्यातील नागरिकांना विशेषत: भगिनींना मैलोनमैल डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते, असे दिसणारे चित्र भूषणावह नाही, अशी पाण्याबाबत स्थिती आहे.
रोजगाराचा न सुटलेला प्रश्न इथल्या बेकारांच्या संख्येत वाढ करणारा ठरत आहे. आजवर लघु औद्यागिक वसाहतीसाठी जागा कुठली ठरवायची, यातच वेळ गेला. आता राजापूर रेल्वे स्थानकाकडील जागा निश्चित करण्यात आली. त्याला पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला. पण, एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.
पर्यटनाला इथे चांगली संधी आहे. मंदिरे आहेत, समुद्र किनारे आहेत. पिकनीक स्पॉट आहेत. पावसाळी दिवसात मन मोहवून टाकणारे धबधबे आहेत. पण, त्यांचा विकास ज्या प्रमाणात व्हायला हवा होता, तो झाला नाही. गतवर्षी सुमारे ३५ ते ४० परदेशी पर्यटक नाटे येथील गणेश अ‍ॅग्रो टुरिझममध्ये आले होते. कोकणच्या नजाकतीच वैभव पाहून ते भारावून गेले होते. परदेशी चलन मिळवून देणाऱ्या या व्यवसायांकडे आजवर ना शासनाने डोळसपणे पाहिले ना इथल्या लोकप्रतिनिधींनी. त्यामुळे पर्यटनाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. हे दुर्दैव संपणे आवश्यक आहे. तालुक्यात सुप्रसिद्ध अशी नाटे, मुसाकाझी, आंबेळगड बंदरे आहेत. इतिहास काळात त्यांना मानाचे स्थान होते. मात्र, आता ती अस्थिपंजर होत आहेत. शासनाने त्यांचा विकास केल्यास जलवाहतूक सुरु होऊ शकेल.
राजापूर शहरात पिकनीक स्पॉट, नाना-नानी पार्क , भिकाजीराव चव्हाण उद्यान अजून विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. आरोग्य व्यवस्थेची तर पुरती दुरवस्था झाली आहे. दोन ग्रामीण रुग्णालयांसह नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र असताना आज त्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. इथली आरोग्यसेवा व्हँटीलेटरवर आहे. चांगले डॉक्टर्स इथे नाहीत, स्टाफ नाही. मशिनरी आहे, पण तज्ज्ञ नाहीत हेच विदारक चित्र मागील अनेक वर्षांपासून पाहावयास मिळत आहे. काजिर्डा येथील जीवघेण्या अपघातानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी शब्दांचे बुडबुडे फोडले. पण, इथल्या आरोग्य सेवेत सुधारणा केली नाही. हे आव्हान आजही कायम आहे.
विविध विभागांची अशी दैनावस्था असताना शिक्षण विभाग मागे कसा राहील. तोदेखील याच समस्यांची शिकार झालेला आहे. शून्य पटसंख्येमुळे मराठी शाळा बंद पडण्याची स्थिती येथे निर्माण झाली आहे. यापूर्वी चार शाळा याच कारणास्तव बंद पडल्या आहेत आणि उर्वरित शाळांवर ते संकट घोंगावत आहे. याव्यतिरिक्त शिक्षण विभागाच्या अनेक समस्या आहेत.
कुपोषित बालकांची समस्या कायम भेडसावत असते. त्याचे प्रमाणदेखील चिंता करायला लावणारे आहे. इतिहास काळात सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या राजापूरला भवितव्यासाठी झगडावे लागत आहे. आता नवीन सरकारवर राजापूरकरांचा कटाक्ष आहे.

तहान भागेना!---रेंगाळलेले
प्रश्न

ट्रामा केअरची प्रतीक्षा
तालुक्यातून सुमारे २० ते २५ किलोमीटरचा मुंबई - गोवा महामार्ग जातो. यादरम्यान पाच ठिकाणे तर अपघातप्रवण आहेत. आजवर या ठिकाणी झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. तसेच जायबंदी होणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. अशावेळी जखमींना केवळ प्राथमिक उपचारासाठी राजापुरात आणावे लागते. मात्र, पुढील उपचाराची व्यवस्था इथे नसल्याने रुग्णांना पुढे हलवावे लागते. यापूर्वी महामार्गावर ट्रामा केअर सेंटर सुरु करण्याबाबत प्रयत्न सुरु झाले. पण, ते नंतर कायमसाठी थांबले हीच शोकांतिका इथली आहे.

प्रकल्पांची मोठी समस्या
तालुक्यात १७ ते १८ लघुपाटबंधारे विभागाचे मध्यम व लघु प्रकल्पाची कामे पूर्णत: रेंगाळलेल्या अवस्थेत आहेत. पूर्ण प्रकल्पातून कालवे न काढल्याने सामान्य शेतकऱ्यांपासून जनतेपर्यंत पाण्याचा कोणालाही लाभ मिळत नाही. यातील अनेक प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. एकूणच पाटबंधारे प्रकल्पांचा बोजवारा वाजला आहे. त्याचबरोबर कोदवली आणि सायबाचे धरण गाळाने भरल्याने यात अपेक्षित पाण्याचा साठा होत नाही, अशी स्थिती आहे.

पावसाळी दिवसात राजापूर शहरावर पुराची टांगती तलवार कायम असते. सुदैवाने सरत्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे केवळ एकदाच पुराचे पाणी जवाहर चौकात आले होते. मात्र, दरवर्षी किमान सहा ते सातवेळा पुराचा वेढा शहराला हा असतोच. त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी यापूर्वी शासनाने शहरातून वाहणाऱ्या दोन्ही नदीपात्रातील गाळ उपसण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, ते अर्धवट सोडून देण्यात आले. मागील तीन वर्षात जरासुद्धा काम झालेले नाही. परिणामी शहरातील नागरिकांच्या डोक्यावरील भीतीची तलवार कायम आहे.


तालुक्यात अनेक छोटे मोठे रस्ते असून, यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्यामध्ये ओणी, अणुस्कुरा, झर्ये, पाचल, जवळेथर, सौंदळ, आडवली, तुळसवडे, रेल्वेस्टेशन, बुरंबेवाडी आदी प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांपासून रुग्णांना होत असून, आजवर या प्रश्नाकडे कुणीच गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे विकास व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण अशा या टप्प्याची दुरवस्था झाली असल्याचे दिसून येते.

Web Title: Problems from dam to employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.