केंद्रप्रमुखांच्या समस्या, प्रश्न तातडीने साेडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:09+5:302021-06-11T04:22:09+5:30
रत्नागिरी : केंद्र प्रमुखांच्या १५ प्रलंबित समस्यान, प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख ...
रत्नागिरी : केंद्र प्रमुखांच्या १५ प्रलंबित समस्यान, प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुखांच्या या विविध मागण्यांवर जोरदार चर्चा झाली.
ऑनलाईन घेण्यात आलेल्या या सभेचे उद्घाटन राज्य संघाचे कार्याध्यक्ष जयंतराव डुबे यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याध्यक्ष अशोकराव महाले होते.
यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील ७८ केंद्र प्रमुख उपस्भित होते. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व तालुकाध्यक्ष महेंद्र वळवी, सुनील कारखेळे, शेषराज गर्जे, श्रीकांत वेल्हाळ, राहुल मोहिते, संतोष करंबळेकर, सीताराम कोरगावकर, राज्य महिला प्रमुख सुनीता देखणे, सुप्रिया मोहिते, शैजेला आखाडे, सायली शिंदे, माधवी काटवटे, मयूरी जोशी, स्वाती साखरकर, स्मिता मांजरेकर, नेहा कांबळे, सुप्रिया कदम उपस्थित होते.
जिल्हा सचिव सुनील जाधव यांनी जिल्हा संघटनेचा आढावा सादर केला. जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांनी संघटनेच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न प्रास्ताविकेत सादर केले. रत्नागिरी जिल्ह्यात केंद्र प्रमुखांच्या रिक्त पदांची भरती तत्काळ करण्याबाबत आक्रमक भूमिका मांडली तर केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी देय एक वेतनवाढ न दिल्यास संघटनात्मक धरणे आंदोलन करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, अशीही भूमिका शिर्के यांनी मांडली.
जिल्हा शिक्षक समितीवर केंद्रप्रमुख केडरचा प्रतिनिधी घेणेबाबत आग्रह धरून राज्य संघटनेने यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करावी, अशी अपेक्षा शिर्के यांनी व्यक्त केली. ‘डायट’मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबाबत जिल्हाध्यक्ष शिर्के यांनी माहिती दिली. ऑनलाईन व तत्काळ माहिती मागितली जाते याबाबत जिल्हा प्रशासनाजवळ चर्चा केली जाईल, असेही शिर्के यांनी सांगितले.
राज्याध्यक्ष अशोकराव महाले यांनी एकूण केंद्रप्रमुख यांच्या १५ प्रलंबित समस्या, प्रश्न यांच्यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून वेळ पडल्यास आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.
कोविड कालावधी संपल्यानंतर राज्यस्तरीय संघटनेचा मेळावा रत्नागिरी येथे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याचे नियोजन लवकरच करण्यात येईल, असे अभिवचन जिल्ह्यातर्फे जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांनी दिले.