रत्नागिरीच्या शासकीय रूग्णालयात रक्ताचा तुटवडा, प्रसुति, शस्त्रक्रिया, डायलिसीससह विविध रूग्णांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 07:15 PM2017-12-02T19:15:35+5:302017-12-02T19:19:47+5:30
रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, डायलिसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयात विविध आजाराचे रूग्ण तसेच वाढत्या अपघातांच्या संख्येमुळे दरदिवशी सरासरी २० ते २५ रक्तपिशव्यांचा पुरवठा लागतो.
रत्नागिरी : येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, डायलिसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत.
जिल्हा शासकीय रूग्णालयात विविध आजाराचे रूग्ण तसेच वाढत्या अपघातांच्या संख्येमुळे दरदिवशी सरासरी २० ते २५ रक्तपिशव्यांचा पुरवठा लागतो. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांत दाखल असणाऱ्या रुग्णांसाठी (विशेषत: हृदयशस्त्रक्रिया, डायलिसीस) नि:शुल्क रक्तपुरवठा करण्यात येतो.
रक्ताची वाढती गरज लक्षात घेता यासाठी शिबिरांच्या तसेच स्वैच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून रक्त संकलित करावे लागते. एप्रिल ते जून या कालावधीत सुट्यांचा कालावधी असला तरी याच कालावधीत विविध साथीच्या आजाराच्या रूग्णांबरोबरच अपघातांची संख्या वाढल्याने जिल्हा रूग्णालयाला रक्त कमी पडत असल्याचे चित्र निर्माण होते. मात्र, या रक्तपेढीची टीम आवश्यक असेल तेव्हा शिबिराचे आयोजन करून रक्तदात्यांना आवाहन करते.
वार्षिक २००० पिशव्या इतके रक्तसंकलन करणारी जिल्हा रूग्णालयाची रक्तपेढी आता वार्षिक ६००० पिशव्या इतके रक्तसंकलन व तितकाच रक्तपुरवठा करीत आहे. म्हणूनच जीवन अमृत सेवेत (ब्लड आॅन कॉल) ही रक्तपेढी कोल्हापूर परिमंडळात प्रथम क्रमांकावर आहे.
सध्या या रूग्णालयात विविध साथींच्या आजारांची रूग्णसंख्या वाढू लागली आहे. तसेच प्रसुति, डायलिसीस रूग्ण, विविध शस्त्रक्रिया व इतर आजारांचे रूग्ण वाढल्याने या रक्तपेढीला अचानक रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
विविध रक्तगटांच्या १५ आणि तांबड्या पेशींच्या ३३ पिशव्याच सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, डालिसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. काही दुर्मीळ गटाचे रक्त उपलब्धच नसल्याने आणखीनच समस्या निर्माण झाली आहे. रक्तसंकलनासाठी सध्या रक्तदात्यांच्या सहकार्याची गरज निर्माण झाली आहे.
विविध गटांच्या रक्ताचा तुटवडा निर्माण होताच या रक्तपेढीतील तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून आवाहन करण्यास सुरूवात केली. त्यामुळे आज शुक्रवारी दिवसभरात १७ रक्तदात्यांनी या रक्तपेढीत जाऊन स्वेच्छेने रक्तदान केले. यात शहरातील गवळीवाडा येथील काही तरूण तसेच नगरसेवक प्रशांत साळुंखे यांचा समावेश होता.
या रक्तपेढीची समस्या जाणून घेऊन दात्यांनी सहकार्याचा हात पुढे करावा. व जिल्हा रूग्णालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत स्वेच्छेने रक्तदान करून रूग्णसेवेस हातभार लावावा, असे आवाहन रक्तपेढीतर्फे करण्यात आले आहे.
तुटवडा असलेले रक्तगट
सध्या या रक्तपेढीकडे बी पॉझिटीव्ह, बी निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह, एबी निगेटिव्ह या गटाचा रक्तसाठा शिल्लक नाही. तसेच ए निगेटिव्ह, आणि एबी निगेटिव्ह साठीच्या तांबड्या पेशींचाही तुटवडा आहे.
सोशल मीडियाचा वापर
जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत त विविध रक्तगटांचा तुटवडा जाणवू लागल्याने सोशल मीडियावरील आवाहनाला प्रतिसाद देत विविध रक्तदाते तसेच संस्था पुढे आल्या आहेत. अत्यावश्यक रूग्णांना तातडीच्या रक्ताची गरज लागते हे लक्षात घेऊन १ ते ३ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. येथील प्रयत्न प्रतिष्ठानतर्फे या रक्तपेढीत रविवार, ३ डिसेंबर रोजी रक्तदान महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे.