लोकवस्तीतच प्रक्रिया-- गाडगेबाबा जयंती विशेष
By Admin | Published: February 22, 2015 10:48 PM2015-02-22T22:48:00+5:302015-02-23T00:21:11+5:30
रत्नागिरी पालिका : पन्नास टक्के कचरा रुग्णालयासमोरच पेटतो--दांडेआडोम घनकचरा प्रकल्पाचे भवितव्य अधांतरीच...
रत्नागिरी : शहरात सात प्रभाग असून प्रत्येक प्रभागात ५ ते ७ गुंठे जागेत छोट्या स्वरूपातील घनकचरा प्रकल्प उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यासाठी दोन प्रभागात जागांची पाहणीही करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे शहरातील ५० टक्के कचऱ्यावर शहरातच प्रक्रिया होईल. उर्वरित कचऱ्यावर नियोजित दांडेआडोम घनकचरा प्रकल्पात प्रक्रिया होईल. त्यामुळे वाहतूक खर्च कमी होईल. मात्र, दांडेआडोमचा घनकचरा प्रकल्प कोणत्याही स्थितीत होणारच, अशी माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. याशिवाय शहरातील प्रत्येक अपार्टमेंटच्या आवारात तीन ते ५ लाखांपर्यंतचे कंपोस्ट खत बनवणारे मशिन बसवण्याची संकल्पना असून, त्यासाठी काही कंपन्यांशी चर्चाह झाली आहे. त्याबाबतचे प्रात्यक्षिकही झाले आहे. अशा मशिन्स अपार्टमेंट्सना स्वखर्चातून घ्याव्या लागणार आहेत. ज्या अपार्टमेंट नव्याने उभारल्या जाणार आहेत, त्यासाठी परवानगी देतानाच बिल्डर्सना कंपोस्ट खताची मशिन बसवण्याबाबत अट घालूनच परवानगी दिली जाणार आहे. या मशिनद्वारे दिवसाला त्या अपार्टमेंटमधून संकलित होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी वेगळ्या कुंड्या ठेवल्या जातील. ओल्या कचऱ्याचे खत तर सुक्या कचऱ्याची पावडर बनवली जाईल. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण आपोआप कमी होईल व दरदिवशी संकलित होणाऱ्या २२ टन कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन कचऱ्याची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होईल. निर्माण होणाऱ्या खताचा वापर त्या अपार्टमेंट्सना बागायतीसाठी करता येईल. उर्वरित कंपोस्ट खत विकणेही शक्य आहे. या मशिनसाठी विजेचा खर्चही कमी येणार असल्याची माहिती मयेकर यांनी दिली.रत्नागिरी शहरातील वाढत्या नागरिकरणासाठी स्वच्छता व कचऱ्याचे विघटन या दोन्ही गोष्टी आवश्यक असून अशा छोट्या प्रकल्पांनी शहराचे सौंदर्य अबाधित राहिल व त्यातून कचऱ्याचे निर्मूलन व कचरा मुक्तीही होईल पालिकेचा हेतू स्पष्ट असला तरीही घनकचरा प्रकल्प व त्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी प्रामुख्याने विचारात घ्याव्या लागणार ्आहेत.(प्रतिनिधी)
घोषणा झाली..
रत्नागिरी नगरपालिकेने कचऱ्याच्या गंभीर प्रश्नावर मार्ग काढणारी क्लुप्ती शोधून काढली असून, शहरातील ७ प्रभागात स्वतंत्र छोटे घनकचरा प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.पालिकेने असे प्रकल्प उभारताना वाहतूक खर्च वाचविणे व शहरातल्या शहरात कचऱ्याची विल्हेवाट लावणे या दुहेरी हेतूने कचरा प्रकल्पांना प्राधान्य दिले असून, जागेची पाहणीही करण्यात आली आहे.रत्नागिरी शहरातील दोन प्रभागात प्रायोगिक तत्त्वावर असा प्रकल्प उभारला जाणार असून, त्यानंतर अन्यत्र ही कल्पना राबविली जाणार आहे.
दांडेआडोम घनकचरा प्रकल्पाचे भवितव्य अधांतरीच...
प्रकाश वराडकर- रत्नागिरी
रत्नागिरी नगरपरिषदेने जंगजंग पछाडूनही दांडेआडोम घनकचरा प्रकल्पाचे भवितव्य अद्याप अधांतरीच आहे. रस्त्याची जागा संपादन करूनही ग्रामस्थांचा विरोध कायम आहे. तसेच दांडेआडोममधील प्रकल्प अंतराच्या दृष्टीने वाहतुकीलाही परवडणारा नसल्याने संपूर्ण क्षमतेचा प्रकल्प तेथे न उभारता शहराच्या प्रत्येक प्रभागातील कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्याचा पर्याय समोर आला आहे. तसेच प्रत्येक अपार्टमेंटजवळ कचऱ्याचे कंपोस्ट खत तयार करणारी मशिन्स बसवण्याचा पालिकेचा विचार आहे. त्यामुळे दांडेआडोम प्रकल्प होणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे.
२००० साली राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदांनी त्यांच्या क्षेत्रात संकलित होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा प्रकल्प उभारावेत, असा आदेश होता. रत्नागिरी नगरपरिषदेने त्याचवेळी दांडेआडोम गावी अडीच एकर जागा खरेदी केली होती. मात्र, त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता आवश्यक होता. तेथे घनकचरा प्रकल्प झाल्यास त्याचा गावाला त्रास होईल. सांडपाणी विहिरींमध्ये झिरपेल, दुर्गंधी निर्माण होईल, यांसारखे मुद्दे उपस्थित करण्यात आले. त्यामुळे ५०० मीटर्स लांबीच्या रस्त्याची जागा देण्यास ग्रामस्थांनी नकार दिला.
शासनाकडून घनकचरा प्रकल्पासाठी नगरपरिषदेवर दबाव येत होता. प्रकल्पासाठी पालिकेला निधीही प्राप्त झाला होता. रस्त्याची अडचण काही केल्या सुटत नव्हती. त्यामुळे आलेला निधी स्वच्छता विभागाच्या दुसऱ्या कामासाठी वापरण्यात आला. त्या पैशातून स्वच्छता विभागाला कचरा वाहतुकीसाठी लागणाऱ्या गाड्यांची खरेदी करण्यात आली. त्यानंतरही दांडेआडोम रस्त्याचा प्रश्न सुटला नाही. पालिकेने दांडेआडोम प्रकल्प जागेपर्यंत जाण्यासाठी रस्त्याची जागा संपादीत करून मिळावी, अशा मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
महिनाभरापूर्वीच ही रस्त्याची जागा जिल्हा प्रशासनाने रत्नागिरी पालिकेच्या ताब्यात दिली. मात्र, ज्यावेळी या प्रकल्पस्थळाची पाहणी करण्यासाठी अधिकारी गेले. त्यानंतर पुन्हा तीव्र झाला आहे. याबाबाबत दांडेआडोम ग्रामपंचायत, फणसवळे ग्रामपंचायतींशी चर्चा करण्यासाठी तत्कालिन मुख्याधिकारी व नगराध्यक्ष मयेकर, अन्य अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. मात्र, त्या बैठकीतही या प्रकल्पाला असलेला विरोध कायम राहिला. रस्त्याची जागाही संपादीत करून घेतली आहे. त्यामुळे आज ना उद्या तेथे प्रकल्प करण्याची नगरपरिषदेची भूमिका कायम आहे. प्रभागात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यावर भर दिला गेला तर दांडेआडोम प्रकल्पाची आवश्यकता नगरपरिषदेला भासणार नाही.