निर्यात-आयातीसाठी कोकण रेल्वेने उचलले महत्वाचे पाऊल; रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात जाणार उत्पादने

By शोभना कांबळे | Updated: March 7, 2025 18:20 IST2025-03-07T18:18:19+5:302025-03-07T18:20:28+5:30

स्वतंत्र यंत्रणा सज्ज केली

Products will be sent directly from Ratnagiri to JNPT port Konkan Railway takes important step for export-import | निर्यात-आयातीसाठी कोकण रेल्वेने उचलले महत्वाचे पाऊल; रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात जाणार उत्पादने

निर्यात-आयातीसाठी कोकण रेल्वेने उचलले महत्वाचे पाऊल; रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात जाणार उत्पादने

रत्नागिरी : निर्यात आणि आयात क्षेत्रात कोकण रेल्वेनेरत्नागिरीसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. आता रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात येथील उत्पादने पाठवता येणार आहे. याचा शुभारंभ गद्रे मरीन एक्सपोर्ट पहिल्या वीस मिनी कंटेनर रेकने करण्यात आला आहे. याकरिता कोकण रेल्वेने रत्नागिरी रेल्वे स्थानकात स्वतंत्र यंत्रणा सज्ज केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक उत्पादने जगाच्या पाठीवर विविध देशात पाठवली जातात तशीच विविध उत्पादने येथे आयात ही होतात. यापूर्वी गोव्यातून रवाना होणाऱ्या रेकमधून जिल्ह्यातील उत्पादने निर्यातीसाठी पाठवली जात होती. पण आता कोकण रेल्वेने या विषयात मोठे पाऊल उचलत रत्नागिरी जिल्ह्यातून स्वतंत्र मिनी कंटेनर रेक वाहतूकची यंत्रणा उभी केली आहे.यामुळे आता निर्यात होणारा माल रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात रवाना होणार आहे.

याचा शुभारंभ रत्नागिरीतील गद्रे मरीन एक्सपोर्ट कंपनीच्या निर्यात मालाने करण्यात आला आहे. कंपनीचे पूर्णतः वातानुकूलित पहिले वीस मिनी कंटेनर रेक रत्नागिरीतून रवाना करण्यात आले आहेत. कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट,गद्रे  मरीन एक्सपोर्ट चे संचालक अर्जुन गद्रे, कोकण रेल्वेचे विभागीय वाहतूक प्रबंधक आणि कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थितीत होते.र त्नागिरी स्थानकातून हे पहिले मिनी कंटेनर रेक रवाना करण्यात आले.
याकरिता रत्नागिरी रेल्वे स्थानकात कोकण रेल्वे कडून स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे.

मत्स्य, फळ प्रक्रिया उद्योगांकरिता मोठी सुविधा

कोकणातील आयात व निर्यातदारांना यामुळे गोव्यातून उपलब्ध होणाऱ्या रेकवर यापुढे अवलंबून रहावे लागणार नाही. कोकणातील मत्स्य आणि फळ प्रक्रिया उद्योगांकरिता ही मोठी सुविधा कोकण रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे.

आयात-निर्यातदारांनी साथ द्यावी

आयात व निर्यातदारांसाठी परिपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोकण रेल्वे प्रयत्न करीत आहे. कोकणातील आयात निर्यातदारांनी कोकण रेल्वेच्या या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी केले आहे.

Web Title: Products will be sent directly from Ratnagiri to JNPT port Konkan Railway takes important step for export-import

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.