'स्केच बनवून घ्या, स्वेच्छेने पैसे द्या', म्हणत ५ हजार रुपये जमवले, गरजूंना अन्नधान्य पुरवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:30+5:302021-06-16T04:42:30+5:30

चिपळूण : कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपला खारीचा वाटा उचलत आहे. आपण यात काय करू ...

Prof. Bothare's social commitment through painting! | 'स्केच बनवून घ्या, स्वेच्छेने पैसे द्या', म्हणत ५ हजार रुपये जमवले, गरजूंना अन्नधान्य पुरवले!

'स्केच बनवून घ्या, स्वेच्छेने पैसे द्या', म्हणत ५ हजार रुपये जमवले, गरजूंना अन्नधान्य पुरवले!

Next

चिपळूण : कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपला खारीचा वाटा उचलत आहे. आपण यात काय करू शकतो, असा विचार करून सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट या कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या विक्रांत बोथरे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे निश्चित केले. इच्छुक व्यक्तीचे स्केच तयार करायचे आणि त्यातून मिळणाऱ्या रकमेतून गरजू लोकांना धान्य द्यायचे, असा उपक्रम त्यांनी हातात घेतला आणि तशी सुरुवातही केली. मिळालेल्या पैशातून त्यांनी आतापर्यंत सात कुटुंबांना मदत केली आहे.

ज्या कोणाला स्वतःचे अथवा घरातील नातेवाइकांचे स्केच बनवून पाहिजे असेल, तर ते बनवून मिळेल व त्यासाठी स्वतःच्या इच्छेने जी काही रक्कम द्यायची असेल, ती देऊ शकता, असा फंडा त्यांनी वापरला आहे. यातून जमा होणारी रक्कम ते सेवाभावी संस्था, तसेच गावातील काही गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी वापरत आहेत.

चित्रकार हा संवेदनशील असतो. आपल्या सृजनशील वृत्तीने व संवेदनशीलतेने तो चित्रांमध्ये नवनवीन प्रयोग करतो. आपण या निसर्गाचे समाजाचे काही देणे लागतो, या निखळ वृत्तीमुळे समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, ही भावना प्रा. बोथरे यांच्या मनात आली. सध्या संपूर्ण जगावर कोविडचे संकट आहे. यामुळे काहींच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींचा व्यवसाय बंद झाला. काही जणांना दोन वेळचे अन्नही मिळत नाही आहे. यासाठी अनेक सेवाभावी संस्था व काही लोक जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच सेवाकार्यात आपलाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने या कोरोनाच्या संकटात एक मदतीचा हात प्रा.बोथरे हे देत आहेत.

त्यांनी काढलेल्या चित्राला काही लोकांनी १००, २०० तर काहींनी ५०० रुपये दिले आहेत. त्यातून आतापर्यंत पाच हजार रुपये जमले असून, त्यातून सात कुटुंबांना त्यांनी जीवनावश्यक वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत. जे आपल्याकडे आहे, त्याचा वापर समाजाच्या हितासाठी करणारी माणसं तशी दुर्मीळच. प्रा.बोथरे यांचे याचसाठी कौतुक केले जात आहे.

Web Title: Prof. Bothare's social commitment through painting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.